भारतातील सनदशीर चळवळीचे प्रणेते म्हणून नाव घेतलं जातं ते गोपाळकृष्ण गोखले यांचं. गोपाळकृष्ण गोखले यांचा जन्म ९ मे १८६६ रोजी कोकणातील चिपळूण तालुक्यातील कोतळुक या गावी झाला. चिपळूण तालुक्यातील गुहागर मधील वेळणेश्वर हे गोखल्यांचे मूळगाव. परंतु गोपाळकृष्ण गोखले यांचे घराणे वेळणेश्वरला न रहाता चिपळूणपासून १० मैलांवर असलेल्या ताम्हणमळा या गावी स्थायिक झाले. पुढे शिक्षणासाठी ताम्हणमळा सोडून ते कोल्हापूरला आले. शालेय शिक्षण झाल्यावर महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते पुण्यात आले. प्रामाणिकपणा आणि सत्यवादी हे गोखल्यांचे गुण विद्यार्थी दशेपासूनच दिसून आले होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर न्यू इरा इंग्लिश स्कूलमध्ये गोखले शिक्षक म्हणून काम करू लागले. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे महाविद्यालय चालविण्यास सुरुवात केल्यानंतर सभासद करताना टिळक व आगरकरांचे लक्ष गोखले यांच्याकडे गेले. त्यांचे गुण बघून फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यांना व्याख्याता या पदावर नेमण्यात आले आणि डेक्कन कॉलेजचे आजीव सभासद करावे असे ठरवले. त्यानंतर थोड्याच दिवसात गोखले यांची प्राध्यापक पदावर बढती होऊन त्यानंतर ते फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य झाले. या निमित्ताने टिळक, आगकरांसमवेत गोखले राजकारणातही प्रवेशकर्ते झाले.
टिळकांचा मार्ग जहाल राजकारणाचा होता तर गोखले मवाळ वृत्तीचे होते. लोकशिक्षणातून समाज जागृती करावी, राजकीय सुधारणांसाठी सतत प्रयत्न करावे, मागण्यांच्या अंमलबजावणींचा आग्रह धरावा असं गोखले यांचं धोरण होतं. महात्मा गांधींचे राजकीय गुरु असलेल्या गोपाळकृष्ण गोखले यांनी फक्त राजकीय सुधारणांची मांडणी केली नाही तर त्या सुधारणा कशा आवश्यक आहे हे ब्रिटिश सरकारला त्यांनी पटवून दिले. १९०२ साली गोखले मध्यवर्ती कायदे मंडळावर निवडून गेले. त्यावेळी त्यांनी अर् थसंकल्पावर बारा भाषणं केली. राजकीय, शैक्षणिक, आर्थिक इ. विविध प्रश्नांवर आपल्या भाषणात त्यांनी विचार मांडले. त्यांची ही भाषणं ऐकून ‘इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये अशी अभ्यासपूर्ण भाषणं ऐकायला मिळत नाहीत’ अशी टिपणी त्यावेळचे व्हॉईसरॉय लॉर्ड मिटो यांनी केली. मोर्लो-मिटो म्हणून जो कायदा करण्यात आला त्याचा मसुदा गोखले यांनी तयार केला होता. अस्पृश्यता व जाती व्यवस्था निर्मूलनासाठी तसेच स्त्री शिक्षणासाठीही त्यांनी प्रयत्न केले. १९०५ साली भारत सेवक समाजाची त्यांनी स्थापना केली. सुधारक, राष्ट्रसभा समाचार इ. वृत्तपत्रातून सुधारणा विषयक विचार गोखले यांनी वेळोवेळी मांडले. गोखले यांचे दूरगामी विचार भारतीय राजकारणावर परिणाम करून गेलेले दिसतात. अशा या नेत्याचे १९ फेब्रुवारी १९१५ रोजी निधन झाले.
Leave a Reply