सदानी, हरीष

स्त्रियांच्या प्रश्नांविषयी अनेक स्त्री संघटना काम करताना दिसतात. पुरुषांनाही स्त्रियांपासून कायद्याने संरक्षण देण्यासाठी सध्या दबावगट तयार होतो आहे. मात्र या परिस्थितीत स्त्रियांच्या संरक्षणासाठी व त्यांचा आत्मसन्मान अबाधित ठेवण्यासाठी पुरुषांनी तयार केलेली मावा (मेन अगेन्स्ट व्हायलन्स अँड अ‍ॅब्युज) ही संस्था अपवादात्मक ठरावी. एकमेकांचा आदर करीत, व एकामेकांबद्दलचा विश्वास वृध्दिंगत करून स्त्री-पुरुषांना सहजीवन जगता यावे यासाठी अंधेरीतील ही संस्था काम करते. विश्वस्त म्हणून या संस्थेचे काम करणार्‍या हरीष सदानी यांना महाराष्ट्र फाउण्डेशनने पुरस्कार देऊन त्यांच्या सेवेला गौरविले आहे.

पारंपरिक पुरुषप्रधान संस्कृतीतील पुरुषी वृत्तीला लगाम घालून स्त्रियांवर होणारा अन्याय दूर करण्याचे काम हरीष सदानी यांनी मावामधून हाती घेतले. पुरुषांना भावना नसतात आणि पुरुषार्थ म्हणजे राग, संताप, बायकांना कमी लेखणे या समजुतीपासून हरिष सदानी लहानपणापासून दूर राहिले. त्यामुळे लहानपणी त्यांना ‘बायल्या’ संबोधले गेले. ‘माझ्या उपहासापेक्षा त्यातून बायकांना कमी लेखण्याची मानसिकता दिसून येते,’ असे ते म्हणतात. टाटा सामाजिक संस्थेतून एमएसडब्ल्यू करताना त्यांनी जेव्हा स्त्रियांच्या संघटनेत काम केले तेव्हा त्यांचा पुरुषांकडे पाहण्याचा टोकाचा दृष्टिकोन सदानी यांना पटला नाही. त्यामुळे मावाच्या स्थापनेत त्यांनी पुढाकार घेतला.

१९९३ मध्ये विविध क्षेत्रांतील युवक या संस्थेत एकत्र आले. शंभरहून अधिक कार्यशाळांमधून स्त्री-पुरुष दोघांसाठीही मार्गदर्शन करण्यात आले. याशिवाय देशभर गाजलेल्या स्त्रियांवरील अन्यायाच्या घटनांमध्ये मावा त्यांच्या बाजूने उभी राहिली. मुलींवरची अ‍ॅसिडफेक, गर्भलिंगनिदान, लैंगिक शिक्षणाची कमतरता याबाबतीत मावाने पुढाकार घेतला. स्त्रियांना त्यांच्या आत्मसन्मानाची जाणीव करून देण्यासोबतच पुरुषांना स्त्रियांच्या प्रश्नांविषयी संवेदनशील बनवणे अधिक गरजेचे आहे, हे लक्षात आल्यावर ‘युवा मैत्री’ च्या माध्यमातून त्यासंदर्भात काम सुरू केले. लग्नपूर्व समुपदेशन, तरुणांच्या विविध प्रश्नांवर मार्गदर्शन, कॉलेजमधून कार्यशाळा घेत मावाने पुण्या-मुंबईतील तरुणांमध्ये जागृती निर्माण केली. मावाने सुरू केलेल्या पुरुष स्पंदनं आणि “पुरुषार्थ म्हणजे…”  या वाषिर्क अंकांनाही पुरस्कार मिळाले आहेत.

गेल्या सतरा वर्षांमध्ये या संस्थेने अनेक आव्हाने स्वीकारली. कायद्याचा वापर करून स्त्रियांना संरक्षण मिळवता येते. पण कायदा वापरण्याची गरजच येऊ नये आणि सामंजस्याने दोघांनाही राहता यावे यासाठी मावाने उचललेली लहान पावले भविष्यात महत्त्वाची ठरणार आहेत. स्त्रिया अन्याय करतात अशी ओरड करणार्‍या पुरुष दबावगटांना या निमित्ताने काही शिकता आले तरी खूप काही साध्य होईल.

(  संदर्भस्त्रोत- महाराष्ट्र टाईम्स )

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*