लेखक, संपादक, प्रकाशक, ज्योतिषतज्ज्ञ आणि सातासमुद्रा पार गेलेल्या अनेक भाषांतून प्रकाशित होणार्या ‘कालनिर्णय’ दिनदर्शिकेचे सर्वेसर्वा म्हणजे ज्योर्तिभास्कर जयंत शिवराम साळगावकर.
साळगावकरांचा जन्म १ फेब्रुवारी १९२९ रोजी सिंधुदुर्ग तालुक्यातील मालवण या गावी झाला. साळगावकरांचे शिक्षण लोकार्थाने मॅट्रिकपर्यंत झाले असले तरी घरातून पारंपरिक संस्कृत भाषेचे आणि वाङ्मयाचे त्यांना शिक्षण मिळाले होते. मराठी साहित्याचा त्यातही प्रामुख्याने संत वाङ्मयाचा त्यांचा गाढा अभ्यास आहे. सुरुवातीला मालवणमधेच ज्योती साप्ताहिकाचे संपादन करण्यातून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात झाली. त्यानंतर त्यांनी लोकसत्तेत सहसंपादकाचे काम केले. हे काम करीत असताना त्यांनी लोकसत्तेच्या वाचकांना एक नवीन खुराक दिला. तो म्हणजे शब्दकोड्याचा. या कोड्याची सर्व रचना आणि निर्मिती ही जयंत साळगावकरांची होती. त्या शब्दकोड्याला प्रसिद्धी मिळाली. त्यावेळी साळगावकर ‘लोकमित्र’ नावाचे साप्ताहिक चालवत असत. १९५८ ते १९७२ या काळात साळगावकरांनी ‘शब्दरंजन’ स्पर्धा या नावाने मराठी लेखकांच्या अवतरणावर आधारित वाङ्मयीन स्वरूपाचे शब्दकोडे चालवले. त्यालाही खूप प्रसिद्धी मिळाली. १९८३ मध्ये ‘धनुर्धारी’ मासिकाच्या दिवाळी अंकाचे एक टाकी लेखन त्यांनी केले.
मुंबई ग्रंथ विक्रेते व प्रकाशक संघ या संस्थेचे पहिली काही वर्षे ते अध्यक्ष होते. तसेच अनेक सामाजिक व वाङ्मयीन संस्थांमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग होता. ग्रंथ प्रसारक सभेचे ते अध्यक्ष होते. नियतकालिकातून विविध विषयांवर त्यांचे सतत लेखन असे. समर्थ रामदास स्वामींच्या जीवनावर आधारित ‘सुंदर मठ’ ही कादंबरी ‘देवाचिया द्वारी’ या ग्रंथाचे पाच खंड, श्री गणेश या देवताचा इतिहास व स्वरूप सांगणारे ‘देवा तूचि गणेश’ आणि आत्मानुभव सांगणारे ‘रस्त्यावरचे दिवे’ इतकी त्यांची ग्रंथसंपदा आहे.
जीवनात अतिशय चढउतार पाहिलेल्या जयंत साळगावकरांनी ‘कालनिर्णय’ या दिनदर्शिकेची निर्मिती केली. असे एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व ज्यांचा सर्व महाराष्ट्राला अभिमान वाटतो.
Leave a Reply