भारतातील विविध प्रांतांतच नव्हे, तर पदेशांतही आपल्या मेणाच्या हलत्या चित्रांच्या प्रदर्शनाने १९२८ ते १९४५ हा काळ गाजविलेले व जन-मान्यता मिळवलेले मूर्तिकार व प्रदर्शनकार म्हणून लेले प्रसिद्ध होते. केशव बाबूराव लेले यांचा जन्म कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या देवगड तालुक्यातील मुटाट या गावी झाला. त्यांचा जन्म १३ मार्च १९०१ रोजी झाला.
वडील बाबूराव हे शेतीसोबत सावकारी करीत व त्यांच्या चांगल्या वागणुकीमुळे ते सहृदय सावकार म्हणून ओळखले जात. शिवाय ते गणपतीच्या मूर्ती बनवून आप्तेष्टांना गणेशोत्सवासाठी विना-मोबदला देत. केशव लेले यांच्या आईचे नाव वाराणसी होते.
शेती कमी होती व सावकारीतही सहृदय स्वभावामुळे फार प्राप्ती झाली नव्हती. परिणामी, आर्थिक परिस्थिती बिकट झाली. त्यामुळे गणेश या ज्येष्ठ मुलाने शिक्षण सोडले व मुंबईला येऊन नोकरी करण्यास सुरुवात केली. पण अल्पावधीतच त्यांना क्षयाचा विकार जडला व नोकरी सोडून गावी परतावे लागले. मग अर्थार्जनाची जबाबदारी सतरा वर्षांच्या केशववर येऊन पडली. केशवचे शालेय शिक्षण मुटाट या जन्मगावी झाले होते व त्यास वडिलांमुळे लहानपणापासूनच गणपती तयार करण्याची आवड होती.
त्या काळात फडके मेणाचे पूर्णाकृती हलते पुतळे बनवून, त्याची प्रदर्शने भरवीत असत. लेले यांनी १९१८ ते १९२५ या काळात उमेदवारी करून ही कला व प्रदर्शन भरविण्याचे तंत्रही शिकून घेतले. इंग्लंडमधील वेम्ब्ले येथे १९२५ मध्ये फार मोठे औद्योगिक प्रदर्शन भरविण्यात आले होते व त्यासाठी ब्रिटिश साम्राज्यातील विविध देशांतील उद्योजक व कलावंतांना आमंत्रित करण्यात आले होते.
त्यांनी १९२७ मध्ये मुंबईतील रामबाग-सी.पी. टँक येथे चित्र-शिल्प व फडके यांच्या मेणाच्या हलत्या व मनोरंजक पुतळ्यांसोबतच कलाकुसरीच्या वस्तूंचे भव्य प्रदर्शन आयोजित केले होते. त्या काळी त्याची प्रवेश फी चार आणे होती व हे ‘विविध कला’ प्रदर्शन मुंबईच्या सांस्कृतिक जीवनातील विशेष घटना ठरली. त्याला वृत्तपत्रांतून भरपूर प्रसिद्धी मिळाली.
पेस्तनजी बोमनजी, धुरंधर, त्रिंदाद, चुडेकर, परांडेकर, हळदणकर, नगरकर, पीठावाला अशा पुढील काळात लोकप्रिय ठरलेल्या चित्रकारांची जलरंग, तैलरंग व पेस्टल या माध्यमांतील चित्रेही, फडके यांच्या मेणाच्या हलत्या पुतळ्यांसोबत महत्त्वाचे आकर्षण ठरली.
स्वतंत्र स्टूडिओ उभारून त्यांनी नवीन पुतळे तयार केले व कराची शहरात बंदर रोडवर, स्टार सिनेमाशेजारी २२ मार्च १९२८ रोजी ‘लेलेज फाइन आर्ट वर्क्स’ या प्रदर्शनाची सुरुवात झाली. विशेष म्हणजे हे प्रदर्शन स्त्रियांसाठी बुधवार व शुक्रवारी दुपारी दोन ते पाचपर्यंत खास उघडे राहील अशी व्यवस्था करण्यात आली होती. तशी वृत्तपत्रांतून प्रसिद्धीही देण्यात आली.
शिल्पकार र.कृ. फडके यांनी सुरू केलेल्या व केशव लेले यांच्या अशा प्रदर्शनांनी महाराष्ट्रातील जनसामान्यांची यथार्थदर्शी वास्तववादी कलेप्रती असलेली अभिरुची वाढवली. त्यातूनच कलेच्या विविध शैलींतील प्रगल्भतेऐवजी आजही महाराष्ट्रात याच प्रकारच्या यथार्थदर्शी कलेचा प्रभाव आढळून येतो. आजच्या महाराष्ट्राला ही मेणाच्या हलत्या पुतळ्यांची प्रदर्शने व ती घडविणारे कलावंत अज्ञात आहेत.
केशव बाबूराव लेले यांचे निधन ५ जानेवारी १९४५ रोजी झाले.
Leave a Reply