मेश्राम, केशव तानाजी

Meshram, Keshav Tanaji

७८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, कथालेखक, कादंबरीकार, कवी आणि समीक्षक असणारे केशव तानाजी मेश्राम यांचा जन्म २४ नोव्हेंबर, १९३७ रोजी अतिशय गरीब कुटुंबात झाला. बालपण अत्यंत कष्टात गेले. तरी शिक्षणावर श्रद्धा असल्यामुळे अशाही परिस्थितीत प्राथमिक, माध्यमिक शिक्षण घेऊन पुढे त्यांनी एम. ए. ची पदवी मिळविली. त्यानंतर पश्चिम रेल्वेच्या कार्यालयीन सेवेत ते सहा वर्षे होते. त्यानंतर महाड येथील महाविद्यालयात तसेच मुंबई येथील महर्षी दयानंद महाविद्यालयात त्यांनी मराठीचे अध्यापन केले. निवृत्तीच्या वेळेस मुंबई विद्यापीठात प्राभारी विभाग प्रमुख म्हणून ते काम पहात होते. हे सर्व होत असताना अनेक जाणिवांचे पदर व्यक्त  करणारी भावनाप्रधान अशी त्यांची कविता व्यक्त होऊ लागली. ‘जुगलबंदी’ , ‘अकस्मात’, ‘चरित’ इत्यादी त्यांच्या काव्यसंग्रहातून दलित जाणिवेचा शोध घेणारी चितनशील वृत्ती दिसते. मेश्रामांनी लिहिलेल्या कादंबर्यातून प्रकर्षाने याच भावना प्रकट होताना दिसतात. ‘पोखरण, ‘हकिकत’ व ‘जटायू’ या कादंबर्या म्हणजे त्याचे उत्कृष्ट उदाहरण. ‘खरवड’, ‘पत्रावळ’, ‘धगाडा’, ‘गाळ आणि आभाळ’, ‘मरणमाळा’, ‘आमने-सामने’, ‘कोळिष्टकी’, ‘ज्वालाकल्लोळ’ इत्यादी कथासंग्रहातून न्याय-अन्याय, समता-विषमता, दलितांच्या जीवनाचे वास्तव, गुन्हेगारी, बकालपणा इत्यादी जीवनानुभव त्यांनी हाताळले आहे. ‘समन्वय’, ‘शब्दांगण’, ‘लोकवाचन, ‘बहुमुखी’ हे समीक्षात्मक ग्रंथ ही प्रकाशित झाले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर गौरवग्रंथ (१९९३) यांचे संपादन ही मेश्राम यांनीच केले आहे.‘छायाबन’ हा ललित निबंधाचा संग्रह त्यांच्या लेखणीची वेगळी धाटणी दर्शविते. ‘विद्रोही कविता’ या निवडक दलित कविता संग्रहाचे त्यांनी केलेले संपादन आणि प्रस्तावना एक विचार देऊन जाते.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*