मराठीतील प्रसिद्ध संगीतसमीक्षक, संगीतरचनाकार, संगीतदिग्दर्शक आणि नाटक, चित्रपट, क्रिकेट इ. विषयांचे चिकित्सक अभ्यासक व लेखक केशवराव भोळे यांचा जन्म २३ मे १८९६ रोजी अमरावती येथे झाला.
केशवराव भोळे १९२६ साली पुण्यात आले. गायक म्हणून कारकिर्दीस सुरुवात केलेल्या भोळ्यांनी गाण्यांना चाली बांधणेही आरंभले. १९३१ सालाच्या सुमारास मराठीत बोलपटांचे प्रमाण जसजसे वाढू लागले, तसतसे प्रसंगाच्या मांडणीस व पात्ररचनेस सुसंगत व उठावदार संगीत देण्याचे प्रयोग होऊ लागले. भोळ्यांनी त्या दृष्टीने सांगीतिक प्रयोग करून पाहिले. पार्श्वगायनाचा पहिला प्रयोग त्यांनी ‘कृष्णावतार’ या चित्रपटामध्ये केला. प्रभात फिल्म कंपनीमध्ये असताना त्यांनी ‘अमृतमंथन’, ‘माझा मुलगा’, ‘संत तुकाराम’, ‘कुंकू’ इत्यादी चित्रपटांना संगीत दिले.
‘एकलव्य’ ह्या टोपणानावाने केशवराव भोळे ह्यांनी वसुंधरा ह्या साप्ताहिकात लिहिलेले अभिजात गायक-गायिकांविषयीचे अनेक लेख त्यांच्या रमणीय शैलीमुळे आणि माहितगारीमुळे विख्यात झाले.
त्यांनी नंतर ‘शुद्धसारंग’ ह्याही टोपणनावाने लेख लिहिले. त्यांत त्याची चिकित्सावृत्ती, परखडपणा, बोचरेपणा इ. विशेष दिसून येतात. आवाजाची दुनिया (१९४८), अस्ताई (१९६२), वसंतकाकाची पत्रे (१९६४), माझे संगीत (१९६४), अंतरा (१९६७) आणि जे आठवते ते (१९७४) हे आत्मचरित्र ही त्यांची ग्रंथसंपदा.
केशवराव भोळे यांचे ९ नोव्हेंबर १९७७ रोजी निधन झाले.
Leave a Reply