किरण यज्ञोपावित हा मराठीमधील ताज्या दमाचा दिग्दर्शक असून, अनेक चित्रपटांद्वारे रसिकांचे निखळ मनोरंजन करून काही लोकांच्या जीवनातील जळजळीत वास्तव त्यांच्यापर्यंत पोहोचविणे ही त्याची शैली आज मराठी रसिकांच्या मनाला चांगलीच भिडलेली दिसते. चिंचवडमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये जन्मलेल्या किरणला लहानपणापासूनच नाटक बघण्याची विलक्षण आवड होती. तरूणपणी प्रायोगिक रंगभुमीमध्ये चपखल बसणार्या अनेक चित्रपट, नाटके, लघुनाटके, व छोट्या मोठ्या जाग्रुतीपर स्किट्ससाठी संहितालेखनाचे काम त्याने केले होते. यातील काही कलाकृतींमुळे त्याने प्रायोगिक रंगभुमीमध्ये स्वतःच्या नावाभोवती प्रसिध्दीचे व वेगळेपणाचे वलयही निर्माण करून घेतले होते.
पण खर्या व अधिक व्यापक अर्थाने किरण यज्ञोपावित हे नाव प्रकाशात आले ते मनोमिलन या अत्यंत वेगळ्या धाटणीवरच्या नाटकामुळे. प्रायोगिक रंगभुमिकरिता किरणने हे नाटक छोट्या प्रमाणावर लिहिले व सादर केलेले. परंतु जशी जशी या नाटकाची लोकप्रियता दिवसेंदिवस अपेक्षेपेक्षा जास्त फुगायला लागली तेव्हा किरणने हे नाटक व्यावसायिकतेचा मुलामा देवून अधिक चकाचक करून मोठ्या नाट्यमंचावर आणायचे ठरविले. अशोक सराफ, श्वेता शिंदे, शशांक शिंदे, मोहित टक्कलकर आदी रंगभुमीवरील कसलेल्या कलाकारांनी या नाटकाला उत्तम न्याय दिला. हे नाटक मराठी रंगभुमिवरील एक मैलाचा दगडही ठरले व ते मराठी समिक्षकांकडून मिळालेल्या पसंतीच्या पावतीचे मानकरीदेखील ठरले. या नाटकाने किरणला लगेचच मराठी दर्जेदार व पारंपारिक साच्यापेक्षा वेगळे कलाविष्कार सादर करणार्या तरूण व जेष्ठ दिग्दर्शक पंक्तीत नेवून बसविले. पण या अल्पावधीतील यशामुळे तो हुरळून गेला नाही. त्याने वेगवेगळ्या संवेदनशील विषयांना तोंड फोडणारी नाटके लिहीणे सुरू ठेवून आपल्यामधील संहिताकाराला नाट्यसृष्टीच्या मातीत अधिक खोलवर रूजविले.
या नाटकानंतर त्याची सुसाट निघालेली गाडी आजगायत कधी थांबलीच नाही. खर तर या नाटकाची अमाप प्रसिध्दी हीच त्याच्या मराठी चित्रपट जगतातील प्रवेशाची नांदी होती. बघ हात दाखवून, एक डाव धोबीपछाड, सुखांत असे कमालीचे लोकप्रिय चित्रपट देवून किरणने त्याच्या व पर्यायाने मराठी चित्रपटसृष्टीच्या उज्वल भविष्याची जणु तुतारीच वाजविली आहे. संहिता लेखनाप्रमाणेच त्याला दिग्दर्शनाचे प्रभावी व अष्टपैलु अंगसुध्दा आहे हे त्याने तार्यांचे बेट या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटातून दाखविले आहे. सौरभ भावे या हौशी लेखकाने लिहीलेली कथा असून या कथेला व्यवसायिकतेची स्पंदने, व मोठ्या पडद्यावर ती कथा यशस्वीपणे चितारली जाण्यासाठी लागणारा बाज देण्याचे काम किरणने केले आहे. कोकणी संस्कृतीचे विलोभनीय दर्शन, व कोकणी माणसाच्या जीवनातील वास्तवाचे भावस्पर्शी चित्रण या चित्रपटाला विनोदांची झालर देवून करण्यात आले आहे.
Leave a Reply