आपल्या विनोदी भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण करणारे प्रसिद्ध अभिनेते किशोर प्रधान यांचा जन्म १ नोव्हेंबर १९३६ रोजी नागपूरच्या प्रतिष्ठित सधन आणि सुसंस्कृत घराण्यात झाला.
त्यांच्या आई मालतीबाई प्रधान यांना नाटकांची आवड होती. ४० च्या दशकात त्या नाटकातून काम करायच्या. त्यामुळे किशोर प्रधान यांना लहानपणीच अभिनयाचे बाळकडू मिळाले. घरातच नाटकाच्या तालमी पहात ते मोठे झाले.किशोर प्रधान यांनी नागपूरच्या ‘मॉरिस’ महाविद्यालयातून पदवी मिळविली. पुढे अर्थशास्त्रात एम.ए. केले व नंतर मुंबईत येऊन त्यांनी ’टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’मध्ये दोन वर्षांची रिसर्च स्कॉलरशिप मिळविली व मास्टर ऑफ सोशल सायन्सेस ही पदवी मिळवून आपले शिक्षण पूर्ण केले.
अभिनयाची कारकीर्द किशोर प्रधान यांनी महाविद्यालयांत असताना विविध स्पर्धामधून अनेक एकांकिकांमधून व नाटकांमधून कामे केली. पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्या ‘रंजन कला मंदिर’साठीही प्रधान यांनी अनेक बालनाट्ये, नाटके केली.
आत्माराम भेंडे यांच्या ‘हॅटखाली डोके असतेच असे नाही’, ‘मालकीण मालकीण दार उघड’ आणि ‘हनिमून झालाच पाहिजे’ ‘जेव्हा यमाला डुलकी लागते’, ‘ती पाहताच बाला’, ‘ब्रह्मचारी असावा शेजारी’, ‘मालकीण मालकीण दार उघड’, ‘लागेबांधे’, ‘लैला ओ लैला’, ‘हनीमून झालाच पाहिजे’, ‘हँड्स अप’, ‘संभव असंभव’ आदी नाटके केली.
जाहीरात, चित्रपट, मराठी तसेच इंग्रजी रंगभूमीवर वेगवेगळया भूमिकांधून त्यांनी आपली छाप उमटवली. किशोर प्रधान यांची अभिनयाची जी शैली होती त्यामुळे अल्पावधीत त्यांनी रसिक प्रेक्षकांच्या मनात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. मराठी प्रमाणेच इंग्रजी रंगभूमीवरही त्यांनी दमदार भूमिका साकारल्या. महेश मांजरेकर दिग्दर्शित लालबाग परळ, शिक्षणाचा आयचा घो, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या गाजलेल्या चित्रपटात त्यांनी भूमिका साकारल्या. लगे रहो मुन्नाभाई चित्रपटात रंगवलेले आजोबा किंवा जब वुई मेट मधील स्टेशन मास्तर या त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत.
किशोर प्रधान यांचे ११ जानेवारी २०१९ रोजी निधन झाले.
Leave a Reply