मराठी कवी, टीकाकार, भाषांतरकार, चरित्रकार व संपादक कृष्णाजी नारायण आठल्ये यांचा जन्म ३ जानेवारी १८५३ रोजी सातारा जिल्ह्यातील टेंभू या गावी झाला.
त्यांचे वडील दशग्रंथी असल्यामुळे संहिता, शिक्षा, ज्योतिष, छंद इ. विषयांचे ज्ञान त्यांना त्यांच्या वडिलांकडूनच प्राप्त झाले. याशिवाय कराड येथे त्यांचे थोडेसे इंग्रजी शिक्षण झाले. त्यानंतर पुण्याच्या ट्रेनिंग कॉलेजात राहून त्यांनी तेथील अभ्यासक्रम पूर्ण केलाद व शिक्षकाचा पेशा पतकरला.
त्यानंतर कोचीन येथे ते जवळजवळ २० वर्षे होते. तेथील वास्तव्यात त्यांनी केरळ कोकिळ हे मासिक काढले व २५ वर्षे ते चालवून तत्कालीन मराठी वाचकांत वाङ्मयाची आवड निर्माण केली. पहिली पाच वर्षे हे मासिक कोचीनहून निघत असे.
भगवत गीते वर विविध वृत्तांत त्यांनी लिहिले. गीतापद्यमुक्ताहार (१८८४) हे आठल्यांचे पहिले पुस्तक. त्यानंतर त्यांनी विविध विषयांवर तिसांहून अधिक पुस्तके लिहिली. त्यांचे बरेचसे लेखन अनुवादात्मक आहे. त्यात स्वामी विवेकानंदांच्या ‘राजयोग’, ‘भक्तियोग’ आणि ‘कर्मयोग’ या विषयांवरील लेखनाचे अनुवाद विशेष प्रसिद्ध आहेत. ते काव्यरचनाही करीत असत. सासरची पाठवणी (१९२३) आणि माहेरचे मूळ (१९२३) ही त्यांची काव्ये त्यांच्या काळात त्यातील प्रासंदिक रचनेमुळे लोकप्रिय झाली होती.
‘केरळ कोकीळ’च्या जून १९००च्या अंकात कृष्णाजी नारायण आठल्ये यांनी केलेल्या ज्यूल्स व्हर्नच्या ‘टू द मून अँड बॅक’च्या अनुवादाला सुरुवात झाली. हा अनुवाद १९०६ पर्यंत अधूनमधून प्रसिद्ध होत होता. हा अनुवाद म्हणजे मराठीतली पहिली विज्ञान कथा होय. कृष्णाजी नारायण आठल्ये यांचे निधन २९ नोव्हेंबर १९२६ रोजी झाले.
Leave a Reply