कुमार गंधर्व (शिवपूत्र कोमकली)

हिंदुस्थानी संगीताच्या क्षेत्रात आपल्या बंडखोर गायकीने पंडीत कूमार गंधर्व यांनी आपला वेगळा ठसा उमटवला. हिंदुस्थानी संगीत परंपरा समजून घेऊन त्यांची मांडणी नव्या पध्दतीने करुन, नवे राग निर्माण करुन, नव्या बंदिशी रचून हिंदुस्थानी संगीतात आधुनिकता आणणारे कलाकार म्हणून त्यांची ख्याती आहे.

पंडित कुमार गंधर्व यांचं मूळ नाव ‘शिवपूत्र सिध्दरामैय्या कोमकली’ असं होतं. त्यांचा जन्म ८ एप्रिल , १९४२ रोजी कर्नाटकातील सुलेभावी इथे झाला. कुमारांचं शालेय शिक्षण अवघ्या तीन इयत्तापर्यत झालं. लहानपणापासून गायनामध्ये त्यांची गती विलक्षण होती.

मात्र त्यांच्या वडिलांनी त्याकडे ‘बालचमत्कार‘ म्हणून न पाहता त्यांना गाणगुणांच्या विकासासाठी मुंबईत प्राध्यापक बी. आर. देवधर यांच्याकडे शिक्षणासाठी दाखल केलं. देवधरांनी कुमारांना रीतसर ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीची तालीम दिली. त्यांच्या गायकीला आकार दिला.

आकलनशक्ती व ग्रहणशक्ती विलक्षण असलेले कुमार तेव्हा वझेबुवा, खाँसाहेब अब्दुल करीमखॉ, ओंकारनाथ ठाकूर इत्यादी बुजुर्गाच्या हुबेहुब नकला करीत. या अनुकरणाचेच रुपांतर पुढे त्यांच्या प्रगल्भ आणि स्वतंत्र गायकीत झालं. कुमारांनी ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीची बंदिस्त चौकट मोडली, तरी त्यांच्या गायकीचा आधार ग्वाल्हेर घराण्याचाच राहिला.

गायनकलेबरोबरच कुमारांनी साहित्य, चित्र, शिल्प आणि वास्तुकला यांचा समग्र अभ्यास केला. तरुण वयात क्षयग्रस्त झाल्याने वैद्यकीय सल्ल्यावरुन कुमार मध्यप्रदेशात देवास इथे वास्तव्यास गेले.

साहित्य, शिल्पकला, चित्रकला, आदी विविध कलांचं दर्शन आपल्या गाण्यात घडवता आलं पाहिजे, या दृष्टीने कुमारांनी वेगवेगळे गानप्रयोग केले. निसर्गाचा सतत अभ्यास हेही त्यांच्या व्यक्तिमत्वाचं वैशिष्टय होतं. संगीताची उत्पत्ती ही नादब्रहयातून झाली असल्याने त्या नादतत्वाचा शोध घेणं, संगीताच्या मूलस्त्रोताकडे जाणं असा त्यांचा प्रयत्न होता.

श्रोत्यांना आपण काही वेगळं देणार आहोत, अशा ठाम धारणेतून त्यांनी त्यांच्या गानप्रतिभेची सोळा रुपं दर्शविणारे प्रयोगशील कार्यक्रम केले. त्यांच्या स्वतंत्र शैलीच्या गायकीमागे त्यांची प्रतिभा, बुध्दिमत्ता, कष्ट व काही नवं व्यक्त करण्याची धडपडही प्रत्ययास येते.

कुमारांनी नवे राग आणि बंदिशी रचल्या. तसेच त्यांनी भजन, ख्याल, ठुमरी, टप्पा, तराणा, भावगीत नाटयगीत असे सर्व प्रकार सारख्याच तन्मयतेनं गायले आणि त्यावर आपली हुकमतही सिध्द केली. कुमारांची मैफल सुनियोजित असे. मैफलीत क्रमशः काय गायचं याबद्दल त्यांचे निश्चित विचार असत. प्रचलित रागांतील पारंपारिक बंदिश ते वेगळया नजरेने मांडत.

देवासमधील वास्तव्यात डॉ. वसंतराव देशपांडे , पंडित बाळकृष्णबुवा वाडीकर, पंडीत कोल्हापूरे इत्यादी कलाकारांनी कुमारांकडे गायकीचं शिक्षण त्यांच्या सुरुवातीच्या काळात घेतलं. कुमारांची पत्नी भानूमती कोमकली , पुत्र मूकूल कोमकली, द्वितीय पत्नी वसुंधरा कोमकली यांच्यासह सुमन दांडेकर, सत्यशील देशपांडे, विजय सरदेशमुख , विलास इनामदार यांची कुमारांच्या शिष्यसंप्रदायात गणना होते.

जयपूर घराण्याचे ज्येष्ठ व श्रेष्ठ गायक म्हणून खॉासाहेब अल्लादियाखाँ यांचा लौकिक आहे. हिंदुस्थानी संगीतात नव्या प्रतिभेचा आविष्कार कुमार गंधर्व यांच्या रुपाने आकाराला आला. हिंदुस्थानी संगीताला या दोघांनी नवं परिणाम दिलं, असं मानलं जांतं.

सुभग सुंदर गाणार्‍या कुमारांनी हिंदुस्थानी संगीतातच केवळ आधुनिकता आणली नाही, तर उत्तर आधुनिकतेचेही ते प्रणेते ठरले, ‘गीत हेमंत‘, ‘गीत वर्षा‘, ‘गीत बसंत‘, मारवाडी, लोकधुने‘, त्रिवेणी, निर्गुणी, भजने, तांबे गीतरजनी , तुकाराम, एक दर्शन, तुलसीदास दर्शन, ऋतुराज मैफल ,‘ठुमरी, टप्पा, तराणा, ‘गौडमल्हार दर्शन‘ ‘तुलशीदास दर्शन‘, बीहरभैरव, सहेली तोडी, व गांधी मल्हार, या रागांची त्यांनी निर्मिती केली.

कुमार गंधर्वाचे कलाक्षेत्रातील बहुमोल योगदान लक्षात घेऊन भारत सरकारने त्यांना ‘पद्मविभूषण‘ किताबाने गौरविलं तसेच गांधर्व महाविद्यालय , विक्रम विश्वविद्यालय , भारत भवन , मध्यप्रदेश कला अकादमी व संगीत नाटक अकादमी या संस्थांनीही कुमारांना सन्मानित केलं.

हिंदुस्थानी संगीतात आधुनिकता आणून संगीत क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणार्‍या या थोर कलाकाराचा मृत्यू १२ जानेवारी १९९२ रोजी झाला.

कुमार गंधर्व यांचा मराठीसृष्टीवरील विविध लेख

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*