एक अतिशय वेगळ्या प्रकारचे, विरोधाभासाने गुंफलेले लक्ष्मीबाईंचे आयुष्य त्यांच्या ‘स्मृतिचित्रे’ या आत्मचरित्रातून समाजासमोर आले आणि ‘युद्धस्थ कथा रम्या’ पद्धतीने लिहिलेले त्यांच्या स्मृतिचित्रातील एक एक चित्र वरवर हलक्या फुलक्या पण आतून दाट गहिर्या रंगाने रंगलेले सार्या महाराष्ट्राच्या मनावर विराजमान झाले. लक्ष्मीबाईंचा जन्म १८७३ मध्ये झाला. पूर्वाश्रमीचे त्यांचे नाव मनुताई गोखले असे होते. वयाच्या ६ व्या वर्षी १८७९ मध्ये त्यांचे लग्न नारायण वामन टिळक यांच्याशी झाले. पुढे परिस्थिती बेताची.
सासरचं वातावरण अतिशय कडक शिस्तीचं आणि टिळकांना स्थिर नोकरी नसल्यामुळे संसार अस्थिर. त्यामुळे आयुष्यभर संसाराला स्थिरता नाही. टिळकांचा विक्षिप्त स्वभाव त्यामुळे सर्व निभावणं कठीणच ! घरात फक्त सव्वा रुपया आणि सव्वाशेर ज्वारीवर टिळकांनी घरी आणलेल्या बावीस मुलांचा ही बाई सांभाळ करते किवा कडक सोवळ्या-ओवळ्याचे मनांवर संस्कार असल्यामुळे एकदा चामड्याच्या पखालीतील पाणी प्यायल्याने सडकून ताप भरलेल्या लक्ष्मीबाई, पुढे एक दिवस डॉ. बालंटाईन साहेबाच्या बंगल्यावर जाऊन, ‘साहेब उद्या माझा बाप्तिस्मा करा !’’ असं ठासून सांगताना दिसतात. तर ‘मनुष्या’चा ‘ष्य’ लिहिता येत नाही म्हणून ठोंबर्याकडून (बालकवींकडून) ‘ष्य’ शिकणार्या लक्ष्मीबाईंच्या ‘स्मृतिचित्र’ या आत्मचरित्राची नवीन ताजी आवृत्ती इतक्या वर्षांनंतरही आपल्या हातात येते.
त्यावेळेस त्यांचे दोन टोकांचे अंतर असलेले सर्व आयुष्यच डोळ्यापुढून तरळत जाते.नारायणराव टिळकांनी ख्रिस्तीधर्म स्वीकारला तेव्हा असह्य होऊन खोलीचे दार लावून भावना मोकळ्या करतांना लक्ष्मीबाई काही ओळी कागदावर लिहितात, म्हणे जातो सोडून नाथ माझा । अतां कवणाला बाहुं देवराजा । सर्व व्यापी सर्वज्ञ तूंच आहे । सांग कोणाचे धरू तरी पाये ।। इथेच त्यांच्या पहिल्या कवितेचा जन्म होतो. ज्याकाळी महिला घराबाहेर पडत नसत त्याकाळी एक बाई १९३३ सालच्या कवी संमेलनाची स्वागताध्यक्षा होऊन आपल्या धारदार भाषणाने कवी संमेलन गाजवते ही आश्चर्याचीच गोष्ट होती. रे. टिळकांनी लिहिलेल्या
‘ख्रिस्तायनाच्या’ साडे दहा अध्यायात चौसष्ट अध्यायांची भर घालून लक्ष्मीबाईंनी ते महाकाव्य पूर्ण केले. १९०९ च्या ‘मनोरंजन’च्या दिवाळी अंकात ‘करंज्यतला मोदक’ ही कल्पनापूर्ण भावकविता प्रसिद्ध झाली आणि महाराष्ट्रात त्यांची कवयित्री म्हणून कीर्ती पसरली. भडकपणा नसलेल्या त्यांच्या कविता ‘भरली घागर’ या नावानी प्रसिद्ध आहेत. दौतीतल्या सांडलेल्या शाईत उमटलेली पावले पाहून संतापाने त्यांचे सासरे लक्ष्मीबाईंना बोलतात, ‘‘मोलाचे दळण दळ आणि माझी शाई आणून दे’’ असे शब्द उच्चारणार्या त्यांच्या सासर्यांना या ‘शाईच्या पावलाने’ आलेल्या लक्ष्मीचे गुण कळले असते तर त्यांच्या तोंडून असे शब्द निघाले नसते. कारण हीच सून दौतीत काडी बुडवून जमिनीवर साहित्य निर्मिती करू लागली आणि पुढे त्या साहित्याचे कौतुक करताना आचार्य अत्रे यांनी त्यांना ‘साहित्यलक्ष्मी’ म्हणून गौरविले तसेच ल. रा. पांगारकरांनी लक्ष्मीबाईंच्या साहित्याबद्दल, ‘‘सत्यतेलाच कलेचे सहजसौंदर्य प्राप्त झालेले आहे’’ असे गौरवोद्गार काढले त्यावेळेस फार शिक्षित नसलेल्या स्त्रीच्या आयुष्यातील असे प्रसंग इतिहासात जमा न झाले तरच नवल ! अ
शा या ‘स्मृतिचित्रकार’ लक्ष्मीबाई टिळकांचे २३ फेब्रुवारी १९३६ ला निधन झाले.
Very nice tru infrmtion???