अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, राज्यघटना, सामाजिक व राष्ट्रीय समस्या इ. चा व्यासंग असलेले विचारवंत राजकीय नेते मधु लिमये यांचा जन्म पुणे येथे १ मे १९२२ रोजी झाला. त्यांच्या वडिलांचा शिक्षकी पेशा होता. नोकरी निमित्त अनेक गावी जावे लागत असल्याने मधू लिमये यांचे शिक्षण त्यांच्या आजोळी पुण्यातच झाले. १९३७ साली मॅट्रिक झाल्यानंतर त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला.
त्यावेळच्या वातावरणामुळे त्यांना राजकारणात रस वाटू लागला. योगायोगाने त्यांचा परिचय एस. एम. जोशी, शिरूभाऊ लिमये, नानासाहेब गोरे व पां. वा. गाडगीळ यांच्याशी झाला. एस. एम. जोशी यांच्या प्रोत्साहनाने वयाच्या १८ व्या वर्षीच ते स्वातंत्र्य चळवळीत शिक्षण सोडून सामील झाले. १९४२ च्या भारत छोडो आंदोलनात त्यांचा सहभाग असल्यामुळे त्यांना चार वर्षांचा तुरूंगवास भोगावा लागला. १९४८ साली त्यांची काँग्रेस सोशालिस्ट पक्षाच्या कार्यकारिणीवर निवड झाली. १९४९ साली समाजवादी पक्षाचे संयुक्त चिटणीस म्हणून त्यांची नेमणूक झाली. त्यानंतर गोवामुक्ती आंदोलनात त्यांचा सक्रीय सहभाग होता. १९५८ मध्ये समाजवादीपक्षाचे ते अध्यक्ष झाले. त्यानंतर १९६४ मध्ये मुंगेर (बिहार) येथून ते लोकसभेवर निवडून गेले. १९७३ ते ८० या काळात बांका मतदार संघातून त्यांची निवड झाली.
मधू लिमये यांनी विपुल लेखन केलेले आहे. ‘त्रिमंत्री योजना’, ‘कम्युनिस्ट जाहीरनाम्याची १०० वर्षे’, ‘स्वातंत्र्य चळवळीची विचारधारा’, ‘पक्षांतर बंदी ? नव्हे, अनियंत्रित नेतेशाहीची नांदी’ इ. त्यांची मराठी भाषेतील पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांनी हिदीत व इंग्रजीतही पुष्कळ लेखन केलेले आहे. ‘राजनिती का नया मोड’, ‘माक्र्सवाद और गांधीवाद’, ‘संक्रमणकालीन राजनिती’ इ. तर ‘प्राईम मुव्हर्स ः रोल ऑफ द इंडिव्हिज्युअल इन हिस्टरी’ हे इंग्रजी पुस्तक प्रसिद्ध आहे.
त्यांच्या या विविधांगी लेखनावरून त्यांच्या चौफेर व्यासंगाची कल्पना करता येते. आपल्या विविध आठवणींचे संकलन करून आत्मचरित्र लिहिण्याचा त्यांनी संकल्प केला होता. आत्मकथा या नावाने त्यातील एक खंड प्रसिद्ध झलेला आहे. अनेक व्यक्ति, अनेक घटना या खेरीज मधू लिमये यांच्या जीवनाची समृद्धता व त्यांच्यावरील संस्कार याचेही आपल्याला त्यात दर्शन घडते.
८ जानेवारी १९९५ रोजी त्यांचे निधन झाले.
Leave a Reply