सिंधुताई सकपाळांनी जेव्हा हजारो अनाथांच्या आयुष्यामध्ये सौख्याचे रंग भरण्यासाठी आपले आयुष्य वेचायचे ठरविले, तेव्हा त्यांच्या पोट्च्या गोळ्याचा, म्हणजेच ममताचे काय करायचे हा त्यांच्यापुढील यक्षप्रश्न होता. तेव्हा केवळ ममताच्या समजुतदारपणामुळे व असामान्य त्यागशील स्वभावामुळे त्या हजारो अनाथांच्या जीवनातील कल्पवृक्षाचे काम करू शकल्या. माई या आपल्या जन्मदात्या असल्या तरी इतर अनाथ मुलांसाठी त्यांचा सहवास जास्त महत्वाचा आहे, व आपला जेवढा त्यांच्यावर,व त्यांच्या प्रेमावर जेवढा अधिकार आहे तेवढाच किंबहुना त्याहून थोडा जास्तच अधिकार भारतातल्या शेकडो मुला मुलींचा आहे हे सत्य त्यांनी कोवळ्या वयातच स्वीकारले होते. ही गोष्ट ऐकायला जेवढी सोपी आहे तेवढी करायला किंवा प्रत्यक्ष अनुभवायला सोपी नाही. कारण आईच्या प्रेमात दुसरा कोणी भागीदार झालेला, तिच्या बालकांना अजिबात चालत नाही. इथे तर सिंधुताईंनी भारतातल्या हजारो निराधारांचे मातृत्व स्वीकारले होते. त्यावेळी ममताच्या चांगुलपणाची कसोटी नकळत पाहिली गेली होती. परंतु ती या कसोटीत खरी उतरल्यामुळे आज महाराष्ट्रातली कित्येक कुटुंबे सुखी झाली आहेत.
ममता सपकाळ यांचा जन्म १९७३ रोजी झाला. आपल्या आईची हालाखीची परिस्थिती व तिला समाजातील इतरांकडून मिळणारी वागणुक त्या उघड्या डोळ्यांनी पाहात होत्या. परंतु कधीही त्यांना समाजाबद्दल घृणा निर्माण झाली नाही. ममता यांचे बालपण अतिशय खडतर अवस्थेमध्ये गेले. त्यांना झोळीत बांधून माई गावोगाव व दारोदार भिक्षेसाठी भटकायच्या. तसेच ट्रेन मध्ये गाणी गावून कशीतरी त्या दोघींच्या पोटाची खळगी भरायची. माईंनी अनाथांच्या कल्याणासाठी जीवन अर्पण करण्याचा व त्यांच्या रखरखीत मनांमध्ये आशेचे दीप उजळविण्याचा निर्धार केला, तेव्हा त्याची झळ ममता यांना बसणार हे उघड होते. आपल्या पोटच्या पोरीकडे जास्त लक्ष दिले तर अनाथांवर अन्याय होईल व पक्षपातीपणाची भावना त्यांच्यामध्ये निर्माण होईल अशी भिती सिंधुताईंना वाटत होती. तेव्हा त्यांनी ममता यांना दगडुशेठ हलवाई ट्र्स्टकडे सोपविण्याचा निर्णय घेतला व अतिशय जड अंतःकरणानी व साश्रु नयनांनी त्यांना निरोप दिला. त्यावेळी ममता यांनी कमालीच्या समंजसपणाने हा कठीण प्रसंग पचवला, अतिशय खडतर परिस्थितींमध्ये मन लावून आभ्यास केला व समाजकार्यामध्ये मास्टर्स ही डिग्रीदेखील मिळवली, मोठ्या परिक्षांच्या वेळी सिंधुताई त्यांना भेटायला यायच्या व येताना दोन रूपयांची मिठाई देखील आणायच्या. आपल्या आईच्या एवढ्याश्या भेटीची प्रेमळ उब, मग त्या उर्वरित वर्षभर टिकवायच्या. ममता आता हडपसर पुणे येथील सन्मती बालनिकेतन या संस्थेच्या अध्यक्षपदाची सुत्रे सांभाळून अनाथांची निरपेक्ष सेवा व सुश्रुशा करीत आहेत. आपल्या आईच्या कामावर सुवर्णकळस चढवित आहेत.
I am Social work college studied in Nashik when you are in Bharti vidyapith. I want talk with you please send me your mobile number