‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे’, ‘भातुकलीच्या खेळामधली’, ‘शुक्रतारा मंद वारा’ यासारख्या एकापेक्षा एक लोकप्रिय गाण्यांचे गीतकार, ज्येष्ठ कवी मंगेश केशव पाडगावकर यांचा जन्म १० मार्च १९२९ रोजी कोकणातील वेंगुर्ले येथे झाला.
त्यांनी मराठी आणि संस्कृत विषय घेऊन ‘एम.ए’ केले व त्यानंतर दोन वर्षे महाविद्यालयात अध्यापनही केले होते. १९५३ ते १९५५ दरम्यान पाडगावकर यांनी ‘साधना’ साप्ताहिकात सहसंपादक म्हणून काम केले. १९६४ ते १९७० या कालावधीत त्यांनी मुंबई आकाशवाणीवर निर्माता म्हणूनही त्यांनी काम केले.
युनायटेड स्टेट्स इन्फर्मेशन सर्व्हिस म्हणजेच युसीसमध्ये त्यांनी मराठी विभागाचे प्रमुख संपादक म्हणून काही वर्षे काम केल्यानंतर १९८९ मध्ये ते निवृत्त झाले. मंगेश पाडगावकर, विंदा करंदीकर आणि वसंत बापट या त्रयीचे एकत्रित काव्यवाचनाचे कार्यक्रम प्रचंड गाजले. त्यांनी अनेक कार्यक्रमांमधून आपल्या कविता सादर करून रसिकांचे मन जिंकले. प्रेम म्हणजे प्रेम असंत, तुमचं आमचं अगदी ‘सेम’ असतं, ही त्यांची कविता तरुनांना भुरळ घालून गेली.
दुबईमध्ये झालेल्या दुसऱ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद पाडगावकर यांनी भुषविले होते.
१९८० मध्ये त्यांच्या सलाम या कविता संग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. २००८ मध्ये त्यांना राज्यातील प्रतिष्ठेचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २०१३ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
धारानृत्य’हा पाडगावकर यांचा पहिला काव्यसंग्रह १९५० मध्ये प्रकाशित झाला. सुरुवातीच्या काळात पाडगावकर यांच्यावर ज्येष्ठ कवी बा. भ. बोरकर यांचा ठसा होता. मात्र नंतर त्यांनी स्वत:च्याच शैलीत आणि स्वतंत्रपणे काव्यलेखन सुरु केले. ‘
जिप्सी’ (१९५२), ‘छोरी’ (१९५४), ‘उत्सव’ (१९६२), ‘विदुषक’ (१९६६), ‘सलाम’ (१९७८), ‘गझल’ (१९८३), ‘भटके पक्षी’ (१९८४), ‘बोलगाणी’ (१९९०) हे पाडगावकर यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. मीरा, कबीर आणि तुलसीदास यांच्या कवितांचे भावानुवादही पाडगावकर यांनी अत्यंत प्रभावीपणे केले होते. ‘भोलानाथ, ‘बबलगम’, ‘चांदोमामा’ हे त्यांचे बालकविता संग्रह प्रसिद्ध आहेत. १९६४ मध्ये प्रकाशित झालेला ‘वात्रटिका’या कवितासंग्रहाने पाडगावकर यांची एक वेगळी ओळख करुन दिली.
पाडगावकर यांच्या ‘गझल’, ‘विदुषक’, ‘सलाम’ या काव्यसंग्रहातून राजकीय आशय असलेली, उपरोधिकपणा असलेली आणि समाजातील विसंगतीवर प्रहार करणारी कविता अनुभवायला मिळाली. सत्तेच्या वर्तुळात वावरणार्या लोकांनी सांस्कृतिक व साहित्यिक क्षेत्रातील माणसांचा केलेला मानभंग, मध्यमवर्गीयांमध्ये आलेली लाचारी, समाजातील विशिष्ट वर्गाची दांभिकता याबद्दल पाडगावकर यांच्या मनात संताप होता तो त्यांनी आपल्या कवितांमधून प्रभावीपणे व्यक्त केला.
पाडगावकर यांचा ‘निंबोणीच्या झाडामागे’हा ललितलेख, निबंधसंग्रह १९५३ मध्ये प्रकाशित झाला. ‘बोरकरांची कविता’, ‘विंदा करंदीकर यांची निवडक कविता’ हे त्यांनी संपादित केलेले काही महत्वपूर्ण ग्रंथ आहेत. ‘जिप्सी’, ‘छोरी’, ‘उत्सव’ या काव्यसंग्रहातील कवितांमधू्न दिसणारा निसर्ग व प्रेम त्यांच्या ‘श्रावणात घननिळा बरसला’ या सारख्या भावगीतांमधूनही व्यक्त झाले होते. पाडगावकर यांनी ’बायबल’ या ग्रंथाचा मराठी अनुवादही केला होता.
तब्बल ७० वर्षे मराठी साहित्यरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार्या मंगेश पाडगावकर यांचे दि. ३० डिसेंबर २०१५ रोजी सकाळी मुंबईतील राहत्या घरी निधन झाले. निधनसमयी ते ८६ वर्षांचे होते. पाडगावकरांच्या पश्चात दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे.
मंगेश पाडगावकर यांच्यावरील मराठीसृष्टीवरील लेख.
खानदानी कविराज मंगेश पाडगावकर (30-Dec-2016)
कवि मंगेश पाडगावकर (30-Dec-2017)
कवि मा.मंगेश पाडगावकर (10-Mar-2018)
ज्येष्ठ कवि मंगेश पाडगावकर (30-Dec-2021)
## Padgaonkar, Mangesh Keshav
Very aptly summarized article…. I want to contact his son in connection with some personal work Both of us studied in D.S.High School Sion. Shri. Mangesh Padgaonkar attended my marriage and i have something personal to talk to his son. when and how can I get the mobile or land line number or e mail of his son? please guide me if possible.