मंजूषा कुलकर्णी-पाटील यांची तब्बल दोन दशकांहून अधिक सांगीतिक कारकिर्द आहे. त्यांचा जन्म २ नोव्हेंबर १९७१ रोजी सांगली येथे झाला. थेट काळजाला भिडणारा स्वर, लांब पल्ला असणाऱ्या आणि दाणेदार ताना, तारसप्तकातील स्वरांची सहज फिरत, सुरांवरची घट्ट पकड, गायनाकडे पाहण्याची सौंदर्यपूर्ण दृष्टी आणि त्यामागचा विचार नेमका पोहोचवण्याची हातोटी या वैशिष्ट्यांमुळे मंजूषा पाटील या सातत्याने देशभरातील रसिकांची दाद घेत आल्या आहेत.
मिरजेच्या ‘अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालया’तून त्या संगीत विशारद झाल्या. त्यानंतर, त्यांनी हिंदी या विषयातील पदवीसह कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून संगीतातही सुवर्णपदकासह मास्टर्स पदवी संपादन केली. देशभरातील प्रसिद्ध संगीत स्पर्धांमध्ये आपला सहभाग नोंदवणाऱ्या मंजूषा यांच्या गायनाकडे इचलकरंजीचे संगीताचार्य पंडित द. वि. काणेबुवा यांचे एकदा लक्ष गेले.
त्यांना अनेक मानाचे पुरस्कारही मिळाले आहेत. संगीतकार राम कदम पुरस्कार , पंडित रामकृष्णबुवा वझे पुरस्कार, पंडित जसराज गौरव पुरस्कार , विदुषी माणिक वर्मा आणि विदुषी मालती पांडे पुरस्कार, षण्मुखानंद संगीत शिरोमणी पुरस्कार , संगीत नाटक अकादमीचा ‘उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार’, राष्ट्रीय कुमार गंधर्व पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.
सवाई गंधर्व संगीत महोत्सव, ग्वाल्हेरचा तानसेन समारोह, चंदीगढचे आकाशवाणी संगीत संमेलन, धारवाडचे उस्ताद रहमत खाँसाहेब महोत्सव अशा देशभरातील विविध ठिकाणच्या मान्यताप्राप्त संगीत महोत्सवांमध्येही त्यांनी आपले गायन सादर केले आहे. लंडन, बांगलादेश, शिकागो, मस्कत, अमेरिका, सिंगापूर येथेही त्यांनी अनेक मैफली रंगनव्या आहेत.
Leave a Reply