मोगूबाई कुर्डीकरांचा जन्म १४ जुलै १९०४ रोजी गोव्यातील कुर्डी गावात झाला. लहानपणापासूनच घरातील संस्कार व आई जयश्रीबाई यांची शास्त्रीय गाण्याची तळमळ मोगूबाईंना गानतपस्विनी होऊनच शांत झाली असेल. मोगूबाईंना आईने १९११ साली हरिदासबुवांकडून प्रथम गानसंस्कार केले. पण हरिदासबुवा म्हणाले मी एका गावात फार दिवस राहत नाही त्यामुळे त्या हताश झाल्या.
मोगूबाईंच्या आईने शेवटच्या श्वासाआधी बाळकृष्ण पर्वतकराना बोलावून आपली अखेरची इच्छा प्रगट केली “मोगू” तुझ्याभोवती घोटाळणारा माझा आत्मा ज्या दिवशी तू मोठी गाइका म्हणून मान्यता पावशील त्याच दिवशी पावन होईल. मोगूबाई मुळातच बुद्धीमान. कोणतीही गोष्ट एकदा सांगितली की चटकन आत्मसात करायच्या. वयाच्या ९व्या वर्षी १९१३ साली त्यांनी चंद्रेश्र्वर भूतनाथ नाटक कंपनीत दाखल झाल्या. पण योगायोग विचित्र होता १९१४ साली मातोश्री जयश्रीबाईना मोगूबाईंपासून देवाने अलग केले त्यांची छत्रछाया गेली.
१९१७साली सतारकर स्त्री नाटक कंपनीत दाखल झाल्या तेथेच चिंतुबुवा गुरव यांनी त्यांना गायनाचे धडे देण्यास सुरूवात केली. त्याच वेळी रामलाल यांच्याकडून त्यांनी दक्षिणात्य कथ्थक नृत्याचे शिक्षण घेण्यासही सुरूवात केली. नर्तनातील मोहक पदन्यास्ा भावपूर्ण मुद्रा लय व अभिनय हे पुढे त्यांच्या स्वरांना सखोल समज व परिणाम देण्यास उपयोगी पडले. चिंतुबुवाना मोगूबाईंच्यात आकलन शक्तीला आणि ग्रहण क्षमतेला एक प्रकारची धार होती तसेच गाणं शिकण्यासाठी कितीतरी ओढ आणि तत्परता आहे असे वाटले. सुरांवरील हुकूमत तालाच ज्ञान व सुरेल संगीत सादर करण्याच भान निराळ होत.
त्या काळात सौभद्रात ‘सुभद्रा’ पुण्यप्रभाव नाटकात ‘किंकिणी’ शारदेत ‘शारदा’ मृच्छकटिकात ‘वसंतसेना’ अशा विविध आर्त आव्हानात्मक भूमिकांतून त्यांना रंगमंच वैभवी करून टाकला. याच काळात त्या दत्तारामजी नांदोकरांच्याकडे गझल शिकल्या ठुमरी दादरा कजरी टप्पा होरी हे संगीत प्रकार आत्मसात केले परंतू त्यांच मन रमेना. काही संगीत प्रकार त्यांना फुलदाणीत सुरेख रचना करून ठेवलेल्या कागदी फुलांसारखे वाटत तर काही कुंडीतील गोजीरवाणी रोपटी पण घनगर्द जंगलाचे भान देणारे पुरातन वृक्ष त्यांना या संगीतात कोठेच आढळले नाहीत. ज्या स्वरांच्या आराधनेने कंठाचे तिर्थस्नान होईल तो सूर हा नव्हे आपल्या आईला अभिप्रेत असलेले संगीत हे नव्हे.
मोगूबाई खूप खचल्या होत्या प्रत्येक ठिकाणी दैव आड येत होतं. त्यात शरीर कमजोर झाले होते. त्यांच्या मावशीने त्यांना १९१९साली प्रकृती स्वास्थासाठी सांगलीला नेलं. सांगलीला जाण त्यांच्या संगीत जिवनाच्या इतिहासातील अत्यंत महत्वाच पर्व होत. याच वर्षी खाँ इनायत पठाण यांच्याकडे त्यांनी एक वर्ष संगीत शिक्षण घेतले. सांगलीतील राजवैद्य आबासाहेब सांबारे यांच्याकडे प्रकृतीच्या उपचारासाठी आल्या आणि त्यांना ऐक नवीन दालनच उघडून मिळाले. राजवैद्यांच्या दिवणखाान्यात दर शुक्रवारी संगीताची मैफल भरत असे. त्यात पं.बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर पं.पलुस्कर खाँसाहेब अबदुल करीम खॉं भूगंधर्व रहिमत खॉं गायनाचार्य रामकृष्णबुवा वझे आणि संगीतातील शिखर म्हणून महाराष्ट्राने गौरविलेले खाँसाहेब अल्लादिया खाँ. महाराष्ट्रातील शिष्ट समाजात शास्त्रीय संगीताला उत्तरेतून आणून मानाचं स्थान मिळवून दिलं. जसं ज्ञानेश्र्वरांच्या काळी थोर संतांची मांदियाळी एकत्र आली आणि सावळया परब्रम्हांचे वेड त्यांनी सगळया समाजात संक्रमित केलं तसचं.
१९२० साली मोगुबाईंना स्वतःहून शिकविण्यासाठी त्यांचे रियाजाचे बोल ऐकून संगीतसम्राट खाँसाहेब अल्लादियाँखाँ यांनी आपण होऊन त्यांचा शिष्या म्हणून स्वीकार केला. ही तालीम वर्षभर चालली कारण खाँसाहेब इनायत पठाण यांनी त्यांची शिकवणी आचानक थांबवली होती.
गोंदवलेकर महाराज आपल्या गुरूच्या शोधात संपूर्ण भारतभर हिंडले. धोर संतपुरूषांना भेटले पण ते आपल्या जीवीचं शिवतीर्थ आहे असं त्याना वाटल नाही. गोंदवलेकर महाराजांना त्यांचा गुरू आसेतू हिमाचल हिंडून झाल्यावर परभणी जिल्हात येहेळ गावी मराठवाडयातील एका कोपर्यात तुकामाईंच्या स्वरूपात भेटला. रामनाम रसायनानं ते साक्षात्कार त्यांनी अनुभवले. अशीच उत्कट इच्छा त्यांना खाँसाहेब अल्लादियाँखाँ भेटल्यावर झाली व त्या म्हणाल्या होत्या “हेच दिव्य संगीत मला आत्मसात करायचं होतं.” १९२२ साली राजर्षी शाहू छत्रपती गेले. त्यातच खाँसाहेबांच उताराला आलेल वय व त्यातच राजाश्रय संपला होता म्हणून त्यांना नाइलाजाने आता सांगलीतून मुंबईला मुक्काम हलवावा लागणार होता त्यामुळे मोगूबाईंच्या गाण शिकविण्यात पुन्हा व्यत्यय येणार होता. पण त्या परत गोव्याला गेल्या.
१९२२ साली मोगूबाई रमामावशी बरोबर मुंबईत खेतवाडीत आल्या. खाँ. अल्लादियाँ खाँची पुन्हा तालीम जवळ जवळ दीड वर्षे लाभली. याच सुमारास लयभास्कर खाप्रुमामा यांची ओळख व सहवास लाभला. त्या दिवसात सुद्धा गायकात शिक्षकांत कुरघोडी दुस्वास मत्सर होता म्हणून अश्या काही अटींवर खाँसाहेबाना एका विद्यार्थीनीची शिकवणी करावी लागली की त्यामुळे मोगूबाईंची शिकवणी बंद झाली. हा अघात त्यांच्यासाठी खूपच मोठा होता.
१९२३ साली श्री.माधवराव भाटियांशी विवाह झाला. पण त्या आधी त्यांना आलेल्या अनुभवावरून त्यांनी एकदम पसंती कळवीली नाही. कारण त्यांना आई हवीहवीशी वाटली तेव्हा ती दुरावली. गुरूदारी आले ज्ञानार्जन केले आणि दूर गेले म्हणून श्री भाटियांना होकार कळविण्या आधी त्यांना त्यांचे मनोगत सांगितले एकमेकांचा विश्वास बसला व मग लग्न झाले. पण १९२३ ते १९३९ साला पर्यंत त्यांच्या संगीत जीवनातील स्थित्यंतर आता त्या एकटया भोगत नव्हत्या तर त्यांना श्री भाटियांचा म्हणजे पतीचा आधारही होता. १९२४ साली आग्रा घराण्याचे बशिरखाँ यांच्याकडे संगीताचे धडे घेण्याचे श्री माधवरावांच्या आग्रहामुळे झाले पण नंतर १९२६ साली बशिरखाँ म्हणाले तुम्ही बडे मियाँचा गंडा बांधा. तरी तालीम बशिरखाँची चालू आणि गंडाबंधन विलायत हुसेन खाँ यांचे त्याना जरा नवलच वाटले. पण बशिरखाँच्या आग्रहावरून गंडाबंधनाचा कार्यक्रम मुंबईतील बोरभाट लेनमधील ‘कालिदास’ बिल्डिंगमध्ये १९२६साली झाला. घराण बदललं तरी कुंडलीतिल खंडीत शिक्षण योग कसा बदलणार. नंतर तीनएक महिन्यानी प्रकृतिच्या कारणास्तव विलयत हुसेनखॉ मुंबईबाहेर गेले.
अल्लादियाखाँ साहेब ज्या बिल्डिंगमध्ये राहत होते त्यांच्या जवळच्या मागील बाजूस मोगूबाई राहत होत्या. त्यांच्या गाण्यातील बदल त्यांना असहय झाला. अल्लादियॉखाँ यानी त्यांच्या भावाला हैदरखाँना कोल्हापूरहून बोलावून मोगूबाईंची तालीम पुन्हा सुरू केली ते साल होते १९२६ आणि घराणे जयपूर. १९२६ सली सूरू झालेली तालीम १९३१ सालच्या एप्रिल महिन्या पर्यंत चालू होती. पण त्यावेळेस मोगूबाई गर्भवती होत्या. १० एप्रिल १९३१ साली मोगूबाईंना कन्यारत्न झाले.
जी व्यक्ती स्वर आणि लय यांच्या स्वाधीन झाली त्यांना संगीतातील मर्म कळले असे म्हणतात. तंतुवाद्यात सारंगी व चर्मवाद्यात तबला ही दोन अती कष्टसाध्य तितकीच कठीण वाद्यं. उस्तादलोक देखील लयीला बिचकतात. मोगूबाईंच्या शेजारी खाप्रूमामा पर्वतकर राहायला आले. त्यांना ‘लयभास्कर’ हीच पदवी होती. स्वर व लय येथे लय पावतात आणि त्याच्या डोलात गाणारा आणि ऐकणारा या दोघांचीही लय लागते. म्हणून त्याला लय म्हणायचे असे पर्वतकरमामा होते. त्यांच्या उपस्थीतीत एकदा HMV मधील रखडलेल साडेपंधरा मात्रेतील योगतालतील यमन रागातील तराण्याची ध्वनिमुद्रिका पाच मिनिटांत रेकॉर्ड झाली जी सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत झाली नव्हती.
१९३४ साली संगीत सम्राट अल्लादियाखाँ यांचा गंडा बांधला. त्यासाठी त्यांनी १२५ तोळे सोने विकून गुरूदक्षिणा दिली. त्या काळात गंडाबंद शागिर्द असणे व नसणे यात औरस व अनौरस संतती इतका फरक केला जात होता. हा २६ वर्षांचा काळ म्हणजे खर्या अर्थाने कुरूक्षेत्रावरील रणांगण होतं. हयाच सुमारास त्या ख्यातनाम गायिका म्हणून मान्यता पावल्या ही तालीम १२ वर्षे चालली. १९३५ साली व्दितीय कन्या ललिता हिचा जन्म झाला. आणि १९३८ साली चिरंजीव उल्हास उर्फ बाबू याचा जन्म झाला. १९३९साली श्री.माधवराव भाटिया यांचा मृत्यु झाला. १९४० पासून मैफलींचे दौरे रेडिओवरून गायन संगीताच्या तालमी सुरू झाल्या.
शास्त्रीय संगीताची उपासना करताना महाराष्ट्रातील कलवंताना जे कष्ट उपसावे लागले आणि अर्ध्या अधीक आयुष्याची वाट लावावी लागली तसे कष्ट दगदग उत्तर हिन्दुस्थानतून गायक व वादक महाराष्ट्रात येऊन स्थायिक झाले त्यांच्या वाटयाला आले नाहीत. गायन वादन हेच मुळी त्याचं खानदान. श्रीमंती मोजायची ती रूपये मोहरांनी नाही तर किती हजार अस्ताई अंतरे आणि धृपदे जवळ आहेत या संख्येवर. मुलीला लग्नात जावयाला हुंडा म्हणून लखनौ घराण्यातील ह्यतबल्यातीलहृ तीनशे कायदे मिळाले होते. अल्लादियाँ खाँसाहेब १८९२साली महाराष्ट्रात आले आणि लोकांच्या गळयातील ताईत झाले. जाणकारांनी त्यांना बरीच बीरूद विशेषणं लावली. उत्तुंग अशा पदव्या बहाल केल्या. अल्लादियाँ खाँसाहेब १३ मार्च १९४६साली मुंबईत पैगंबरवासी झाले.
त्यानंतर मोगुबाईंनी त्यांच्या मुलीला किशोरीला गायनाचे धडे देण्यास सुरूवात केली. त्यानंतर त्यानी बर्याच गुरूंकडे शिक्षणासाठी पाठवले. १९६५ साली त्यांनी कुर्डीगावातल्या रवळनाथ मंदिराचा जिर्णोद्धार केला ज्याने मोगूबाईंनी त्यांच्या आजीला दिलेला शब्द पुरा केला.
१९६८साली नोव्हेंबरमध्ये त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते “संगीत नाटक अॅकेडमीचे अॅवॉर्ड” देऊन गौरवण्यात आले होते. १९६९ मध्ये आकाशवाणी तर्फे सत्कार झाला. केंद्र सरकारने २६ जानेवारी १९७४ साली मोगुबाईंना ‘मद्मभुषण’ पुरस्कार देऊन गौरवीले. मार्चमध्ये महाराष्ट्र शासनाने गौरवपूर्वक मानधन मंजूर केले. १९७५ साली अनेक संगीत संस्थानी सन्मान केले. ‘द लास्ट टिटान’ ‘द ओनली व्हिजार्ड‘ ‘गानतपस्विनी’ म्हणून सन्मान. १९८५साली किशोरी ताईंस संगीत नाटक अॅकेडमीचे अॅवॉर्ड मिळाले. ‘पद्मभुषण’ पुरस्काराचा मान १९८७ साली राष्ट्रपतींच्या हस्ते प्राप्त झाला. हे व असे अनेक पुरस्कार मिळाल्याचे ऐकून त्यांना धन्य झाल्याचे वाटले.
मोगूबाईंच्या काळात संगीतविद्या आत्मसात करण ही सोपी गोष्ट नव्हती कारण थोर उस्तादांच्या जीवन धारणा वेगळया होत्या. आपली विद्या आपल्या कुटुंबीयाना वारसदारनाच देण्याची अत्यंत संकुचित आणि मार्यादीत कल्पना असल्यानं इतर कोणालाही ही कला मिळवणं म्हणजे कष्टाचं व किमतीचं काम होतं. विद्यादानाच्या बाबतीत ही मंडळी कंजूष होती. इतर कलकार आपल्या अनमोल चिजा हिरावून नेतील म्हणून फारच गुप्त ठेवण्यात येत असत. ‘कुबेरान आपल अक्षय भांडार चोरांच्या भीतीनं भूमीत दडवावं अशा पैकी हा प्रकार होता” हे गोविंदराव टेंबे यांनी फार खेदाने म्हंटल आहे.
गानतपस्विनी मोगूबाई कुर्डीकर यांना १० फेब्रुवारी १९९९ रोजी देवाज्ञा झाली आणि एका तळपत्या व्यक्तीमत्वाचा अस्त झाला.
( लेखन व संशोधन – जगदीश पटवर्धन )
गानतपस्विनी मोगूबाई कुर्डीकर यांच्यावरील मराठीसृष्टीवरील लेख.
महान गायिका गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर (10-Feb-2017)
गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर (17-Jul-2017)
Leave a Reply