लेखक, विधिज्ञ, राजकीय पुढारी, वक्ते आणि पुणे विद्यापीठाचे कुलगुरु बॅरिस्टर मुकुंद जयकर यांचा जन्म १३ नोव्हेंबर १८७३ रोजी मुंबईत झाला.
मुकुंद रामराव जयकर यांचा पुणे करारावर स्वाक्षऱ्या करणाऱ्या नेत्यांमध्ये समावेश होता. जयकरांचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांनी मुंबईतील एल्फिन्स्टन विद्यालय व सेंट झेवियर महाविद्यालय यांतून शिक्षण घेतले. मुंबई विद्यापीठाच्या अनेक पदव्या त्यांनी संपादन केल्या. वयाच्या चोविसाव्या वर्षी इंग्लंडला जाऊन ते बॅरिस्टर झाले आणि मुंबई उच्च न्यायालयात कायदेपटू म्हणून प्रसिद्धीस आले.
वकील म्हणून त्यांनी भरपूर पैसे मिळविले. त्यांतून त्यांनी अनेक संस्थांना देणग्या दिल्या. त्यांनी टिळक स्वराज्य फंडालाही मोठी देणगी दिली होती. प्रथम ते स्वराज्य पक्षात होते. नंतर त्यांनी केळकर प्रभृतींबरोबर प्रतिसहकार पक्ष काढला. ते प्रिव्ही कौन्सिल व फेडरल कोर्टातही न्यायाधीश झाले. तिन्ही गोलमेज परिषदांचे ते सभासद होते. त्यांना पुढे संविधान समितीचे सभासद म्हणून घेतले; पण फार दिवस ते काम त्यांनी केले नाही.
’स्टडीज इन वेदान्त’ या इंग्रजी पुस्तकाचे जयकरांनी संपादन केले. त्यांचे हिंदू धर्माविषयीचे विचार त्यांनी ’मराठी मंदिर’ या नियतकालिकातील लेखांद्वारे प्रकाशित केले.
पुणे येथे १९१८ साली भरलेल्या १४ व्या मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद बॅ.मुकुंदराव जयकरांनी भूषविले होते. २३ एप्रिल १९२३ रोजी गुलबर्गा येथे झालेल्या हैदराबाद सामाजिक सुधार संघाच्या अध्यक्षस्थानी होते.
मुकुंद रामराव जयकर यांचे निधन १० मार्च १९५९ रोजी झाले.
Leave a Reply