विसाव्या शतकातील भारतातील प्रतिभावंत व राष्ट्रीय किर्तीच्या कलाकारांमध्ये त्यांचा आवर्जुन उल्लेख केला जातो त्यापैकी मुख्य नाव म्हणजे नारायण श्रीधर बेंद्रे यांच. त्यांचा जन्म २१ ऑगस्ट १९१० रोजी इंदोरमध्ये झाला. चिनी चित्रकलेपासून ते आदिम कलेपर्यंत, अशा निरनिराळ्या कलाप्रकारांमध्ये त्यांनी असामान्य कौशल्य व कुशलता संपादन केली होती. बेंद्रेंनी आग्रा विद्यापीठातून १९३३ साली बी. ए.ची पदवी संपादन केली. याच काळात इंदूर येथील “स्टेट स्कूल ऑफ आर्ट’ मध्ये दत्तात्रय दामोदर देवळालीकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी कला शिक्षणही घेतले. १९४५ मध्ये ते शांतिनिकेतन येथे दाखल झाले व तेथे त्यांच्या कलाकारी वृत्तीला खर्या अर्थाने प्रतिभेला आकार मिळू लागला. नंदलाल बोस, रामकिंकर बाजी, व विनोद मुखर्जी अशा नामवंत कलाकारांसोबत त्यांना काम करण्याची संधी मिळाली.
१९४७ ते १९५० या कालावधीत बेंद्रेंनी ग्रेट ब्रिटन, अमेरिका, फ्रान्स, हॉलंड, पश्चिम जर्मनी, इटली, ईजिप्त, लेबानन, जॉर्डन, इराक, इराण, अफगाणिस्तान आणि जपान या देशांना भेटी देऊन तेथील कलासृष्टीचा अभ्यास केला. तसेच न्यूयॉर्क येथील “आर्ट स्टुडंट्स लीग’ मध्ये “आर्मीन लॅंडेक“ या कलातज्ञाच्या मार्गदर्शनाखाली आरेख्यक कलेचा अभ्यास केला. अनेक देशांमध्ये त्यांनी आपल्या कलाकृतींची प्रदर्शने आयोजित केली. १९५० ते १९६६ या कालावधीत बेंद्रे यांनी बडोद्याचा “महाराजा सयाजीराव विद्यापीठा“मध्ये चित्रकला विषयाचे प्राध्यापक व नंतर ललित कला विद्या शाखेचे अधिष्ठाता या नात्याने कार्य केले. बडोद्यातून प्राध्यापक म्हणून निवृत्त होऊन ते मुंबई येथे स्थायिक झाले आणि व्यावसायिक चित्रकार म्हणून काम करू लागले.
नारायण बेंद्रेंनी कोणत्याही एका विशिष्ट चित्रशैलीची वा पंथाची बांधिलकी त्यांनी मानली नाही. दृक्प्रत्ययवादी तंत्राच्या प्रभावातून निर्माण झालेली स्वच्छंदतावादी चित्रशैलीतून स्वत:चे कलाविश्व रेखाटले. बेंद्रे यांची अनेक चित्रे भारतातील तसेच परदेशातील कलासंग्रहालयांतून जतन केलेली आहेत.
१९५२ साली भारतातर्फे चीनमध्ये गेलेल्या पहिल्या सांस्कृतिक प्रतिनिधिमंडळामध्ये चित्रकार म्हणून नारायण बेंद्रें यांचा समावेश होता. “आर्ट सोसायटी ऑफ इंडिया’ चे तीन वर्षे अध्यक्ष होते. १९६२ ते १९७२ याकाळात दिल्ली येथील राष्ट्रीय कला-अकादमीच्या ललित कला शाखेचे उपाध्यक्ष म्हणून, तर १९७२ ते १९७३ व १९७७ ते १९७८ या काळात “बाँबे आर्ट सोसायटी’चे कार्य त्यांनी केले.
आपल्या कारकिर्दीत त्यांनी भरपूर समाजसेवा केली व गरीब विद्यार्थ्यांच्या हितासाठी ते नेहमीच खंबीरपणे उभे राहिले. स्वातंत्र्योत्तर काळानंतर लगेचच जेव्हा गुरू राधा किशन ह्यांनी दिल्लीमध्ये पहिले जनता ग्रंथालय उघडण्याच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाला सुरूवात केली.
१९५५ मध्ये नारायण बेंद्रेंना ललित कला अकादमीच्या राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. १९६९ मध्ये “पद्मश्री“ आणि १९९२ मध्ये “पद्मभूषण“, अशा पुरस्कार देवून त्यांना भारत सरकारने यथेच्छ सन्मानित केले. १९८४ मध्ये त्यांना विश्वभारती विद्यापीठाकडून “अबन गगन पुरस्कार“, मध्य प्रदेश राज्य सरकारकडून “कालिदास सन्मान“ जाहीर झाला. मध्य प्रदेश येथील खैरागढच्या “इंदिरा कला संगीत विश्वविद्यालया’ तर्फे त्यांना डी. लिट् ही पदवी देऊन सन्मानित केले आहे.
Leave a Reply