भारतासारख्या महासत्ता बनण्याच्या वाटेवर असलेल्या देशाला त्याच्या गरीबीवर, व बेरोजगारीवर अंकुश ठेवण्यासाठी लोकसंख्या नियंत्रणाची जेवढी गरज आहे तेवढीच गरज जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात होईल तेवढ्या खर्चाचा अपव्यय टाळण्याची व सुलभ तंत्रज्ञान जे सामान्य माणसाचा पैसा, वेळ व शक्ती या तिन्ही गोष्टींची बचत करेल असे तंत्रज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्याची देखील आहे. विज्ञान व तंत्रज्ञान हे उपजत गुंतागूतीचे क्षेत्र असल्याने पैश्याची, व किचकट पध्दतींची बचत करून नव नवीन शोध लावणे व विवीध तंत्रांद्वारे ते लोकामध्ये रूजवणे हे तसे आव्हानच असते. पण हे आव्हान भारतामधील तरूण शास्त्रज्ञांनी आपल्या शोधांमधे लिलया पेललेले दिसते. नरेंद्र करमरकर हे या तरूण शास्त्रज्ञांमधले एक नसले तरी पैशांची होईल तेवढी बचत करून व आपल्या संशोधन कार्याला सहजतेची जोड देवून मगच त्या शोधाला आकार व गती प्राप्त करून देण्याचा पायंडा त्यांनीच या क्षेत्रात पाडला आहे. अंकगणिताच्या लाखो आकडेमोडी, करामती व हिशेब आपला संगणक चुटकीसरशी आपल्याला करून देत असला तरी जेव्हा हजारो घटकांची गुंतागूंत झालेला प्रश्न त्याला टाकला जातो तेव्हा त्याच घोडं हे अडतच!
परंतु विज्ञानातील क्लिष्टतांची परिसीमा गाठलेली व असंख्य गुंतागुंतींच्या गोष्टींतून जन्माला आलेली उदाहरणेसुध्दा, पुर्वीपेक्षा जलद व विश्वासार्ह पध्दतींनी सोडवू शकेल, व तंत्रज्ञानाचा अनभिषीक्त व निर्वीवाद सम्राट, असलेल्या संगणकालाही मात देऊ शकेल असे तंत्रज्ञान, भारतामधील जेष्ठ शास्त्रज्ञ नरेंद्र करमरकर यांनी शोधून काढले. हे तंत्रद्यान वापरायला, व कार्यान्वित करायला साधे व सोपे होतेच तसेच ते सर्वसामान्यांना परवडणारे देखील होते. जसे, अमेरिकेत कुठूनही व कुठेही कमीत कमी खर्चात फोन करता येईल आणि ते ही टेलिफोनच्या तारांमध्ये सर्वात कमी गुंतागुंत होईल अशा पध्दतीने, ह्या अनोख्या यंत्रणेचा आराखडा त्यांनी तयार केला. तसेच अमेरिकन एयरलाईन्स च्या सहकार्याने कोणत्याही दोन शहरांमध्ये विमानसेवा सर्वात अधिक सोयीची व फायदेशीर कशी होईल हेही प्रात्यक्षिकांद्वारे दाखविले. नरेंद्रांनी सुचविलेली यंत्रणा शास्त्रशुध्द व विश्वासार्हतेबरोबरच आर्थीक बचतीच्या दृष्टीनेही आदर्श अशीच होती. कारण या पध्दतीचा वापर करून अब्जावधी रूपयांचे इंधन व वीज वाचविणे सहजशक्य होते. या शोधामुळे त्यांची किर्ती वार्याप्रमाणे चोहीकडे पसरली.
नरेंद्र करमरकर यांचा जन्म १९५५ साली ग्वाल्हेर मध्ये, एका सामान्य मराठी कुटुंबात झाला. १९७८ मध्ये नरेंद्र यांनी बी टेक ही पदवी आय. टी. टी. बाँबे, तर एम. एस. ही मानाची पदवी कॅलिफोर्निया इनस्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी मधून संपादन केली. १९८४ मध्ये ते ‘बेल’ या न्यु जर्सी मधील जगप्रसिध्द प्रयोगशाळेत रूजु झाले. त्यानंतर त्यांनी कॅलिफॉर्निया विद्यापीठातूनच पी. एच. डी. देखिल मिळवली. ते सध्या सुपरकॉम्प्युटींग साठीच्या एका नव्या वास्तुशास्त्रावर काम करीत आहेत. तसेच त्यांनी टाटा मुलभूत संशोधन संस्थेत अध्यापनाचे काम केले आहे.
Leave a Reply