नीलम प्रभू या माहेरच्या नीलम देसाई. त्यांचा जन्म २६ एप्रिल १९३५ रोजी मुंबई येथे झाला. त्यांचे वडील हिरामण देसाई हे नाट्यदिग्दर्शक. त्यामुळे नाट्यकलेच्या वातावरणातच त्यांची वाढ झाली. नीलम प्रभू या अनेक वर्षे आकाशवाणीत कार्यरत होत्या. १९६० च्या दशकात रेडिओ हे मनोरंजनाचे एकमेव साधन असताना त्यांनी आकाशवाणीवर नभोनाट्यातून आपले संवादकौशल्य सादर करायला सुरुवात केली.
आकाशवाणीवरील केवळ ‘प्रपंच’च नव्हे तर ‘आम्ही तिघी’ ह्यासारख्यां श्रुतिकांमधून किंवा ‘प्रकाश माक्याचे तेल’, ‘काय झालं? बाळ रडत होतं.’ यांसारख्या जाहिरातीमधून, आणि ’आपली आवड’ सारख्या लोकप्रिय कार्यक्रमाच्या निवेदिका आणि वृत्तनिवेदिका म्हणून त्यांचा आवाज रसिकांच्या चांगलाच परिचयाचा होता. शिस्तशीर स्वभाव आणि कामातील काटेकोरपणामुळे त्या आकाशवाणीतील शिपायापासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांना त्यांच्याविषयी आदर होता. नीलम प्रभू यांच्या आवाजात एक वेगळाच तजेला होता. तो मधुर तर होताच पण नितळ आणि निरागसही होता. अनेक श्रीतिकांमधून त्यांचा आवाज लगेच ओळखू येई, पण त्या आपल्या आवाजातून आपल्या वाट्याला आलेल्या व्यक्तिरेखेला असा काही चेहरा प्राप्त करून देत की श्रीत्यांच्या मनोमंचावर ती जिवंत होऊन जाई.
अखिल भारतीय नाट्य परिषद, बोरिवलीने सुरू केलेल्या ‘स्वराभिनय’ पुरस्काराच्या त्या पहिल्या मानकरी होत्या. त्यांचा पहिला विवाह नाटककार बबन प्रभू यांच्याशी झाला होता. बबन प्रभू यांचे कालवश झाले. त्यानंतर नीलम प्रभू यांनी यशवंत देव यांच्याशी विवाह केला होता व करुणा देव झाल्या होत्या.
नीलम प्रभू यांचे ५ जून २०११ रोजी निधन झाले.
Leave a Reply