अभिनेत्री पद्मा चव्हाण यांचा जन्म कोल्हापूरमध्ये ७ जुलै १९४४ रोजी झाला.
अभिनयासाठी आवश्यक असलेले बोलके डोळे, क्षणाक्षणाला चेहऱ्यावरती बदलणारे भाव व आकर्षक व्यक्तीमत्व हे सर्व गुण त्यांना लाभले होते. १९५९ मध्ये भालजी पेंढारकर यांनी ‘आकाशगंगा’ नामक चित्रपट तयार केला होता. त्या चित्रपटात त्यांना भूमिका मिळाली आणि त्यांचा चंदेरी दुनियेत प्रवेश झाला.
त्या फक्त चित्रपटसृष्टीत प्रसिद्ध होत्या असं नसून त्यांनी रंगभूमीवरही कारकीर्द गाजवली होती. ‘गुंतता हृदय हे’ मधील ‘कल्याणी’, ‘नवऱ्याची धमाल तर बायकोची कमाल’ मधील ‘सुनीता’, ‘माझी बायको माझी मेव्हणी’ मधील ‘रसिका’, ‘लग्नाची बेडी’ मधील ‘रश्मी’ या भूमिकांनी तर अक्षरशः प्रेक्षकांच्या मनावर मोहिनी घातली.
१९७५ या वर्षात ‘या सुखांनो या’ व १९७६ मध्ये ‘आराम हराम है’ या चित्रपटातील भूमिकांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार प्राप्त झाले.
पद्मा चव्हाण यांचे १२ सप्टेंबर १९९६ रोजी निधन झाले.
Leave a Reply