तरुणपणी वाद्यसंगीताकडे आकृष्ट झालेल्या गजेंदगडकर यांनी प्रख्यात बासरीवादक पन्नालाल घोष आणि मुरलीधर शास्त्री यांच्याकडे बासरीवादनाचे शास्त्रोक्त शिक्षण घेतले होते. त्यांचा जन्म ११ जानेवारी १९२८ रोजी नाशिक येथे झाला. बासरीवादनाच्या पलिकडे संगीतकार आणि संगीत समीक्षक अशीही गजेंदगडकर यांची ओळख होती. स्वरमंडल या वाद्याचे वादन करणारे ते एकमेव कलाकार होते. सारंगी आणि व्हायोलिन वगळता सर्व प्रकारची वाद्ये वाजवण्यात त्यांचा हातखंडा होता.
ऑल इंडिया रेडिओमध्ये प्रोड्यूसर म्हणून काम करताना गजेंदगडकर यांना गंगूबाई हनगल, कुमार गंधर्व, मल्लिकार्जुन मन्सूर यांच्यासारख्या अनेक श्रेष्ठ गायकांचा सहवास लाभला. कल्पकता आणि सतत नव्याचा ध्यास घेतलेल्या गजेंदगडकर यांनी ७५व्या वाढदिवशी बासरीवर ७७ राग वाजवण्याचा कार्यक्रम दोन सत्रांत सादर केला होता.
अरविंद गजेंद्रगडकर हे एक जोतिषीही होते. असे सूर! अशी माणसं!, सूरसावल्या, स्वरसंगम, स्वरांची स्मरणयात्रा, स्वरांच्या बनात, आलाप विशारद, The Indian Flute, तबला विशारद, ५० राग – आलाप, गती, बासरी वादन, वाद्यवादनाचे संपूर्ण गाइड, संगीतशास्त्राचे गाइड, हार्मोनियम गाइड आणि मोरू परतुनी आला ही कादंबरी अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. पत्रकार निखिल गजेंदगडकर हे त्यांचे चिरंजीव.
पं.अरविंद गजेंद्रगडकर यांचे ३० मे २०१० रोजी निधन झाले.
Leave a Reply