संगीतभूषण पं. राम मराठे यांचा जन्म २३ ऑक्टोबर १९२४ पुणे येथे झाला.
पं. राम मराठे यांचा जन्म पुरुषोत्तम व मथुराबाई या दांपत्यापोटी झाला. ते यांचे दुसरे अपत्य. माधव, अनंत वसंत हे 3 भाऊ आणि गोदावरी कमला ह्या २ भगिनी. त्यांच्या वडिलांची पुणे येथे खानावळ होती. लहानपणीच त्यांची संगीताची ओढ वडिलांनी लक्षात घेतली. वडील व काका गजानन यांच्याकडून रामभाऊंवर गाण्याचे व अभिनयाचे संस्कार झाले. त्यांचे शालेय शिक्षण भावे स्कूलमध्ये झाले. सुरुवातीस त्यांनी मुळे यांच्याकडे गाण्याचे व अंबीटकर यांच्याकडे तबल्याचे शिक्षण घेतले.
मराठे यांना ‘सागर फिल्म’ या संस्थेच्या धरम की देवी (१९३५) या चित्रपटात बालकलाकाराची भूमिका मिळाली. येथून त्यांचे चित्रपटातील अभिनय क्षेत्रात पदार्पण झाले. त्यानंतर १९४० पर्यंत ‘मेहबूब फिल्म’ या चित्रपटनिर्मिती संस्थेच्या मनमोहन (१९३६), जागीरदार (१९३७) आणि वतन (१९३८) या चित्रपटांत त्यांनी काम केले. तसेच न्यू थिएटरच्या लाईफ इज अ स्टेज या इंग्रजी चित्रपटातही त्यांनी काम केले. याशिवाय जयंत पिक्चर्स, इम्पिरिअल फिल्म आदी चित्रपटसंस्थाच्या चित्रपटातही त्यांनी विविध भूमिका केल्या. प्रभात फिल्मच्या माणूस, गोपाळकृष्ण या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका गाजल्या; पण त्यांची ओढ अभिजात शास्त्रीय संगीताकडे होती.
शास्त्रीय संगीत आत्मसात केल्यानंतर रामभाऊंनी ग्वाल्हेर, जलंदर, पाटणा, कोलकाता, दिल्ली व अमृतसर येथील शास्त्रीय संगीत संमेलनामध्ये भाग घेतला. नटवर्य गणपतराव बोडस यांच्या आग्रहास्तव त्यांनी संगीत सौभद्र या नाटकातील कृष्णाच्या भूमिकेद्वारे संगीत रंगभूमीवर पदार्पण केले (१९५०). बालगंधर्व, हिराबाई बडोदेकर, केशवराव दाते, विनायकबुवा पटवर्धन, जयमाला शिलेदार, नानासाहेब फाटक इत्यादींबरोबर त्यांनी एकच प्याला, संशयकल्लोळ, स्वयंवर, मंदारमाला, सौभद्र, जय जय गौरीशंकर (१९६६) इत्यादी नाटकांत भूमिका केल्या. तसेच काही नाटकांचे संगीत दिग्दर्शन केले आणि अहिरभैरव, बैरागी, जोगकंस, अभोगी, बागेश्री कंस, बसंतबहार इ. रागांचा कौशल्यपूर्ण प्रयोग त्यांत केला.
रामभाऊंनी त्यांच्या संगीत कारकीर्दीत अनेक विद्यार्थ्यांना विनामूल्य विद्यादानाचे कार्य केले (१९६५-८९). त्यांच्या शिष्यवर्गात उल्हास कशाळकर, विश्वनाथ बागुल, योगिनी जोगळेकर, मधुवंती दांडेकर रामप्रथम, राम नेने, सुधीर देवधर, निवृत्ती चौधरी, योगिनी जोगळेकर, शशी ओक, सुरेश डेग्वेकर, प्रदीप नाटेकर, सुधीर दातार, राजेंद्र मणेरीकर इत्यादींचा समावेश होतो. त्यांच्या संगीताचा वारसा त्यांचे दोन सुपुत्र संजय व मुकुंद हे आणि सुशीला मराठे-ओक व वीणा मराठे-नाटेकर या दोन कन्या व नातवंडे पुढे चालवीत आहेत. ठाणे मनपा माजी खासदार कै प्रकाश परांजपे ह्यांच्या पुढाकाराने १९९२ पासून पंडितजी स्मरणार्थ ४ ते ५ दिवसांचा संगीत महोत्सव आयोजित करते. शिवाय नादब्रह्म – मुकुंद मराठे ह्यांच्या वतीने अनेक शास्त्रीय, नाट्य संगीत इ संशोधनपर सांगीतिक कार्यक्रमाचे सातत्याने आयोजन केले जाते २०१७ मध्ये पं. राम मराठे यांचं ‘नादब्रह्म स्वरयोगी’ हे ६०० पानी समग्र चरित्र २ DVD सह प्रसिद्ध झाले आहे. वाचकांचा ह्याला उदंड प्रतिसाद आहे.
राम मराठे यांचे निधन ४ ऑक्टोबर १९८९ रोजी झाले.
Leave a Reply