किराणा घराण्याच्या गौरवास्पद अशा माळेतील आणखी एक लखलखता मोती, म्हणून माननीय पंडित श्रीकांत देशपांडे यांनी मराठी रसिकांच्या हृद्यसिंहासनावर गेली कित्येक वर्षे आपल्या दैवी आवाजाने अधिराज्य केले आहे. ते पंडित सवाई गंधर्वांचे नातू होते. त्या अर्थाने त्यांच्या धमन्यांमधून संगीताचे मंगल स्वर वाहत असणारच.
श्रीकांतजींचे वडील डॉ. वसंतराव म्हणजे नानासाहेब देशपांडे हे ही संगीतातले चांगले जाणकार होते. सवाई गंधर्वांचे जावई होण्यापूर्वी त्यांनी शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले होते. विवाहानंतर खुद्द सवाई गंधर्वांनी जावयाला आपल्या घराण्याची संथा दिली. हा वारसा पाठीशी घेऊन श्रीकांतजी स्वरांच्या मांदियाळीतच लहानाचे मोठे झाले. महंमद हुसेन आणि सरस्वतीबाई राणे यांच्याकडून गायनाचे धडे काही वर्षे गिरवल्यावर श्रीकांतजी शिष्य म्हणून स्थिरावले ते स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांच्यापाशी.
आपल्या मधील सच्या, अष्टपैलु व प्रतिभावंत कलाकाराला, नियमीत तालिमीची व कठोर साधनेची जोड देवून त्यांनी अल्पावधीतच आपल्या गुरूंचा विश्वास व मर्जी संपादन केली. आपल्या सद्गुरूंच्या नातवाला गायनाचे धडे देण्यात पंडितजींना एक निराळे समाधान व साफल्य वाटत असे. ही अनेक पिढ्या चालणार्या ऋणानुबंधांची हकीकत ते आपुलकीने सांगत.
किराणा घराण्याचे गायक पंडित फिरोज दस्तूर यांच्याकडूनही श्रीकांतजींनी धडे गिरवले. हे शिक्षण सोपे व्हावे, यासाठी काही काळ त्यांनी मुंबईतही मुक्काम केला. श्रीकांतजींच्या गायनावर स्वाभाविकच पंडित भीमसेन जोशी यांचा कधीही पुसला जावू न शकणारा ठसा होता. पण आपले गायन ही आपल्या गुरूची केवळ नक्कल न वाटता स्वतंत्र प्रज्ञेचा व अदाकारीचा अविष्कार वाटला पाहिजे वाटले पाहिजे, हीच त्यांची तळमळ होती. गायनाची त्यादृष्टीने आवश्यक ती सर्व तयारी त्यांनी केली. ‘शास्त्रीय संगीत हा महासागर असून त्याचे पुरते आकलन होण्यास एक जन्म पुरणार नाही’ असे श्रीकांतजी म्हणत. ही त्यांच्या विनम्रतेची खूण होती.
श्रीकांतजींना संगीताचा प्रसार, अध्यापन आणि त्याचे परीक्षण या सार्यातच रस होता. त्यामुळेच सवाई गंधर्व महोत्सव तसेच तो समृध्द सोहळ्या साकारणार्या ‘आर्य संगीत प्रसारक मंडळा’ त श्रीकांतजींनी अनेक जबाबदार्या एकहाती आनंदाने स्वीकारल्या. गेली अनेक वर्षे श्रीकांतजी हेच सवाई गंधर्व महोत्सवाचे आधारस्तंभ होते.
( संदर्भस्त्रोत- महाराष्ट्र टाईम्स )
Leave a Reply