हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचे गाढे अभ्यासक, संगीत गुरू व आग्रा घराण्याचे गायक पंडित श्रीकृष्ण नारायण रातंजनकर ऊर्फ अण्णासाहेब रातांजनकर यांचा जन्म १ जानेवारी १९०० रोजी झाला. त्यांचे वडील श्री नारायण गोविंद रातंजनकर हे ब्रिटिश राजवटीत पोलिस अधिकारी होते, तसेच उत्तम सतारवादकही होते. वयाच्या सातव्या वर्षी श्रीकृष्ण नारायण रातंजनकरांनी कारवारच्या पं. कृष्णम् भट्ट (कृष्णभट्ट होनावर) यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेण्यास प्रारंभ केला.
१९११ मध्ये त्यांनी गायक व संगीतज्ञ पं. विष्णू नारायण भातखंडे यांच्याकडून मार्गदर्शन घेण्यास सुरुवात केली व आजमितीला ते भातखंडेबुवांचे सर्वात ख्यातनाम शिष्य मानले जातात. १९२६ मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठातून पदवी प्राप्त केली.
त्यांनी अभिनव गीतमंजरी, अभिनव संगीत शिक्षा, तानसंग्रह, हिंदुस्थानी संगीताची स्वरलिपी, यांसारखी अनेक पुस्तकेही लिहिली. तसेच रजनी कल्याण, केदार बहार, सावनी केदार, मार्ग बिहाग, यमनी बिलावल, सालग वराळी, गोपिका वसंत, हंसरंजनी अशा नव्या रागांचीही रचना पंडित रातंजनकरांनी केली. अण्णासाहेब रातांजनकर यांचे १४ फेब्रुवारी १९७४ रोजी निधन झाले.
Leave a Reply