पं. वामनराव सडोलीकर

पं. वामनराव सडोलीकर यांच्याबद्दल आजच्या पिढीला काही माहित नाही, पण मागच्या दोन पिढ्या मात्र जरूर त्यांची आठवण काढतात. त्यांचा जन्म १६ सप्टेंबर १९०७ रोजी कोल्हापूरपासून जवळच कोथळी गावी झाला. पं. वामनराव सडोलीकर यांना घरात भाऊ म्हणत. फार लहान वयात घर सोडून मुंबई आणि नाशिकला पं. विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्या ‘गांधर्व महाविद्यालया’त मा.पं. वामनराव सडोलीकर दाखल झाले.

पं. वामनराव सडोलीकर यांनी संगीत सम्राट अल्लादिया खाँसाहेबांच्या जयपूर-अत्रौली घराण्याच्या गायकीचा फार लहान वयात ध्यास घेतला. त्यांना मनोमनी आराध्यदैवत मानलं. काही कारणांमुळे खाँसाहेबांनी ब्राह्मणाला शिकवणार नाही अशी शपथ घेतली होती. त्यामुळे भाऊंनी त्यांचे सुपुत्र उस्ताद भूजीर्खाँ यांचा गंडा बांधला. कालांतरानं भूजीर्खाँ प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबई सोडून कोल्हापूरला गेले. जाताना थोरल्या खाँसाहेबांकडे पं. वामनराव सडोलीकर यांना सुपूर्द करून म्हणाले, ‘अब्बाजी, वामनराव आपले आहेत. आता आपण त्यांना तालीम द्या.’

कोल्हापूरच्या अंबाबाईच्या देवळात भूजीर्खाँ सेवा करीत, तर भवानी मंडपात छत्रपतींच्या कुलस्वामिनीची अल्लादिया खाँ संगीत सेवा करीत. भाऊंचे वडील (दादा) दत्तोपंत माधव कुलकणीर् (सडोलीकर) स्वत: उत्तम सतार वाजवीत. ते रागदारीचे जाणकार होते. लहानग्या वामनला घेऊन ते संगीतसेवेच्या वेळी दोन्ही देवळात हजर असत. एवढंच नव्हे, तर छत्रपतींच्या कुटुंबातील व्यक्तींच्या छत्र्या (स्मारकं) असत तिथे त्यांच्या जयंती-पुण्यतिथीनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात भूजीर्खाँ गात असत. याही ठिकाणी दादा भाऊंना घेऊन ऐकायला हजर असत.

खाँसाहेब कधीकधी फिरायला जाताना भाऊंना घेऊन जात. फिरता फिरता त्यांचे काही अनुभव, कधी उपदेश, कधी त्या दिवशी भाऊंचा ऐकलेला रियाज यावर टिप्पणी करून खाँसाहेब सूचना करीत. ते दिवस भाऊंनी हृदयात जपून ठेवले होते. खाँसाहेब आणि त्यांचं कुटुंब हे भाऊंनी जन्मभर पुण्य मानलं.

पं. वामनराव सडोलीकर राहात असलेल्या दादरच्या हिंदु कॉलनीतील चौथ्या रस्त्याला मुंबई महानगर पालिकेने पं. वामनराव सडोलीकर यांचे नाव दिले आहे. वामनराव सडोलीकर यांचे २५ मार्च १९९१ रोजी निधन झाले.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*