मराठी तत्त्वज्ञ व स्वाध्याय परिवाराचे प्रणेते, संस्थापक पांडुरंगशास्त्री आठवले यांचा जन्म १९ ऑक्टोबर १९२० रोहे येथे झाला.
`दादा’ म्हणजेच पांडुरंग शास्त्री आठवले हे एक उत्तम तत्त्वज्ञ आणि समाज सुधारक होते. त्यांनी `स्वाध्याय’ परिवाराची स्थापना केली. श्रीमद् भगवद्गीता आणि उपनिषदे यांच्यावर आधारीत तत्त्वज्ञानाच्या आधारे त्यांनी समाजसुधारणेचा ध्यास घेतला आणि कर्मयोगातून सामान्य जनतेला सुखी जीवनाचा मार्ग शोधून दिला. त्यांचे आजोबा लक्ष्मणराव आठवले दलितांना भगवद्गीतेचे पाठ सांगायचे.
आजोबांनी दिलेल्या या संस्कारांमुळे दादा प्रत्येक सजीव शक्तीत देव बघायला लागले. दादांनी हिंदू धर्मातील जाचक चातुर्वर्ण्य पद्धतीचा निषेध केला, त्याग केला. दादांचे वडील वैजनाथ हे संस्कृतचे शिक्षक होते. दादांच्या बुद्धिमत्तेची जाणीव त्यांच्या आजोबांनी हेरली होती. पारंपरिक शालेय शिक्षण दादांच्या बुद्धिमत्तेला न्याय देण्यास असमर्थ असल्याचं त्यांना वाटत होतं.
प्राचीन गुरु-शिष्य परंपरेवर आधारित असा हा आधुनिक प्रयोग होता. या विषयांशिवाय त्यांनी संस्कृत भाषेवर आणि वेद, उपनिषदे, भगवद्गीता, कालिदासाचे काव्य यांच्यावरही प्रभुत्व मिळवले. हा विशेष अभ्यासक्रम नऊ वर्षं चालला. याचा अतिशय चांगला परिणाम दिसून आला. दादांवर उत्तम संस्कार झाले. त्यांच्या विचारांना योग्य दिशा मिळाली.
वास्तव जीवन आणि भगवद्गीतेची शिकवण यांची सांगड घालण्यासाठी तत्त्वज्ञान विद्यापीठाची कल्पना दादांच्या मनात आली. तरुणांनी भगवद्गीतेची तत्त्वे वास्तव जीवनात आचरणात आणावीत, म्हणून त्यांनी या विद्यापीठात दोन अभ्यासक्रम सुरू केले. पहिला अभ्यासक्रम `कला विभाग’ असा होता. ज्यात संस्कृत, इंग्रजी, तर्कशास्त्र, वेद, गीता, उपनिषदे आणि तत्त्वज्ञान हे विषय शिकविले जात.
त्यांना जगभरातील अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले. त्यात १९८७ साली `इंदिरा गांधी प्रियदर्शिनी पुरस्कार’ १९८८ साली `महात्मा गांधी पुरस्कार’, १९९२ साली `लोकमान्य टिळक सन्मान`, १९९६ साली `रेमॉन मॅगसेसे पुरस्कार’ आणि १९९९ साली भारत सरकार तर्फे `पद्मविभूषण पुरस्कार’ अशा अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांचा समावेश आहे. त्यांचा जन्मदिवस स्वाध्याय परिवार जगभर मनुष्य गौरव दिन म्हणून साजरा करतात.
पांडुरंगशास्त्री आठवले यांचे २५ ऑक्टोबर २००३ रोजी निधन झाले.
Leave a Reply