प्रभाकर जोग यांचा जन्म २५ डिसेंबर १९३२ रोजी झाला.
प्रभाकर जोग यांचे वडील साखर कारखान्यांच्या तंत्रज्ञानातील जाणकार होते. आई-वडिलांपकी कोणी कलेच्या प्रांतात नव्हते, मात्र वडिलांना संगीत नाटकांची पहिल्यापासून आवड होती.
पुण्याजवळच्या मांजरा फार्म येथे उमेदवारी करीत असताना बालगंधर्वाचें नाटक पुण्यात आले की वडील सायकलवरून बारा किलोमीटरची रपेट करून पुण्यात येत असत, रात्रभर नाटक पाहून, परतीची सायकलवारी करून पुन्हा दुसऱ्या दिवशी कामावर हजर रहात.
प्रभाकर जोगांची मोठ्या आकारमानाच्या व्हायोलिनशी चाललेली झटापट पाहून त्यांच्या आजीने त्याना अडीचशे रुपयांचे एक छोटे व्हायोलिन आणून दिले. प्रभाकर जोग या वाद्यावर हळूहळू प्रभुत्व मिळवत गेले.
कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात पुण्यातील वाड्यांमधून त्यांनी सव्वा रुपया आणि नारळ या बिदागीवर व्हायोलिन वादनाचे कार्यक्रम केले. एस.पी. कोलेजच्या मैदानात भरलेल्या स्नेहसंमेलनात व्हायोलिन वाजवत असताना मदानापलीकडे राहणाऱ्या सुधीर फडके यांनी ते ऐकले आणि प्रभाकर जोगांना भेटायला बोलावले.
गीतरामायणाच्या सुमारे ५०० कार्यक्रमांना प्रभाकर जोग यांची साथ होती. स्नेहल भाटकर यांच्याकडे जोग यांनी ‘गुरुदेवदत्त’ या १९५१ च्या चित्रपटात व्हायोलिन वादन केले. स्वरलिपी लेखनकलेत पारंगत असलेले प्रभाकर जोग त्यानंतर संगीतकार श्रीनिवास खळे, दशरथ पुजारी, हृदयनाथ मंगेशकर, यशवंत देव, वसंत पवार, वसंत प्रभू, राम कदम आणि यशवंत देव यांच्याबरोबर काम करू लागले.
हिंदी चित्रपटसृष्टीतील मदनमोहन, एस. डी. बर्मन, लक्ष्मीकांत प्यारेलाल, शंकर जयकिशन, खय्याम, ओ.पी. नय्यर, उषा खन्ना, जयदेव, रवींद्र जैन या संगीतकारांसोबतही त्यांनी काम केले. व्हायोलिन वादन आणि संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना वसुंधरा पंडित, लता मंगेशकर, सूरसिंगार, चित्रकवी,गदिमा पुरस्कार अशा वैविध्यपूर्ण पुरस्कारांनी त्यांचा गौरव झाला होता.
Leave a Reply