मराठी संगीतकार प्रभाकर पंडित यांचा जन्म ३० सप्टेंबर १९३३ रोजी झाला. प्रभाकर पंडित यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण साताऱ्याला झाले. संगीताची आवड बालपणापासून असल्याने त्यांनी गायनाचे मार्गदर्शन मटंगेबुवा; तसेच पेंढारकरबुवा यांच्याकडे घेतले. व्हायोलिनचे शिक्षण त्यांना जे.वाय. पंडित यांच्याकडून मिळाले.
संगीतात कारकिर्द घडविण्यासाठी ते मुंबईला आले. दादर येथे त्यांनी ३० वर्षे “मधुवंती व्हायोलिन विद्यालया”चे संचालन केले. मुंबई आकाशवाणी केंद्रावर १५ वर्षे ते काम करत होते. मुंबई विद्यापीठाच्या सुगम संगीत विषयाचे ते अभ्यागत व्याख्याते, तसेच परीक्षकही होते.
संगीतबद्ध केलेल्या गाण्यांच्या ध्वनिफितींमुळे मा.प्रभाकर पंडित नावाजले गेले. याखेरीज दहा चित्रपट, वीस नाटके, संगीतिका, संगीत नाटके यांकरताही त्यांनी संगीत दिले. तसेच जाहिरातींच्या जिंगल्सचीही निर्मिती त्यांनी मोठ्या प्रमाणावर केली.
मंगेशकरांसह सुरेश वाडकर, सुमन कल्याणपूर, कविता कृष्णमूर्ती, साधना सरगम ते स्वप्नील बांदोडकर पर्यंत सुमारे ७८ विविध गायकांचे आवाज त्यांनी आपल्या ध्वनिफितींच्या माध्यमातून लोकांसमोर आणले. भावगीते, भक्तिगीते, लोकगीते, अभंग, आरत्या, संतरचना, बालगीते असे अनेक गीतप्रकार त्यांनी संगीतबद्ध केले.
“सुगम संगीताचे सौंदर्य’ या पुस्तकाचे लेखनही त्यांनी केले होते. प्रभाकर पंडित यांचे निधन २८ डिसेंबर २००६ रोजी झाले.
Leave a Reply