हरहुन्नरी कलावंत आणि घराघरात पोहोचलेल्या ‘चिंटू’ या चित्रमालिकेचे निर्माते प्रभाकर वाडेकर यांचा जन्म ८ ऑगस्ट १९५६ रोजी झाला.
प्रभाकर वाडेकर यांचे शिक्षण नू. म. वि. प्रशाला आणि बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय येथे झाले. शालेय वयापासून नाटकात काम करणाऱ्या प्रभाकर यांनी महाविद्यालयीन दशेत काळाच्या पुढची नाटके रंगमंचावर सादर करून पुरुषोत्तम करंडक स्पर्धा गाजविली. ‘अर्थ काय बेंबीच्या विश्वचक्री’, ‘मंथन’ आणि ‘ओंडका’ या एकांकिका त्यांनी सादर केल्या.
‘ड्रॉपर्स’ या संस्थेमध्ये अनंत कान्हो कुलकर्णी दिग्दर्शित ‘कोसळे आज इथे देव्हारा अर्थात मेलो मेलो मेलो ड्रामा’ या नाटकात प्रभाकर आणि सुहास कुलकर्णी ही जोडगोळी होती. अरुण काकतकर यांची निर्मिती व दिग्दर्शन असलेल्या ‘म्हातारीचा काळ’नाटकाचे लेखन वाडेकर यांनी केले होते.
चारुहास पंडित यांची चित्रे आणि प्रभाकर वाडेकर यांची कथा यातून साकारणारा चिंटू दैनिक सकाळमधून दररोज भेटीला यायचा. भोपाळ दुर्घटनेच्यावेळी त्यांनी आणि चारूहास पंडित यांनी एक चित्रमालिका वृत्तपत्रामध्ये चालवली. याच वेळी त्यांची जोडी जमली आणि ‘चिंटू’ची कल्पना साकार झाली.
पुढे चिंटू www.chintoo.com या साइटवरून इंटरनेटवर भेटू लागला. तसेच २०१२ मध्ये त्यावर एक सिनेमाही प्रसिद्ध झाला. एक्स्प्रेस वृत्तसमुहात जाहीरात व्यवस्थापक म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. टिव्ही मालिका, एकांकिंका यांच लेखनही केले.
प्रभाकर वाडेकर यांचे १५ जुन २०१३ रोजी निधन झाले.
Leave a Reply