प्रशांत पुरुषोत्तम दामले. मराठी चित्रपट, मराठी रंगभूमी आणि मराठी दूरचित्रवाणीवरील गाजलेले कलाकार. प्रशांत दामले यांचा जन्म ५ एप्रिल १९६१ रोजी मुंबईत झाला. त्यांचे वास्तव्य मुंबई येथे असते.मराठी चित्रपटातील आणि रंगभूमीवरील त्यांची कारकिर्द १९७८ मध्ये सुरु झाली. या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी ३७ उत्तमोत्तम चित्रपट आणि २६ नाटकांत अभिनय केला. यातील चार दिवस प्रेमाचे, एका लग्नाची गोष्ट, जादू तेरी नजर, गेला माधव कुणीकडे ही नाटके आणि वाजवा रे वाजवा, सवत माझी लाडकी, पसंत आहे मुलगी, तू तिथं मी हे चित्रपट विशेष प्रसिद्ध झाले.
छोटा पडदा अर्थात दूरचित्रवाणीवरही त्यांनी २४ मराठी मालिकांत भाग घेतला. यातील काय पाहिलंस माझ्यात, घरकुल, बे दुणे तीन या मालिका आणि झी मराठी या वाहिनीवरील आम्ही सारे खवय्ये ही खाद्यसंस्कृती विषयी मालिका फार लोकप्रिय झाली.त्यांना महाराष्ट्र राज्य पुरस्कार, नाट्यदर्पण पुरस्कार तसेच अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या विविध पुरस्कारांनी बर्याच वेळा सन्मानित केले गेले आहे.
लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये त्यांच्या नावावर तब्बल पाच रेकॉर्डस नोंदले गेले आहेत. यामध्ये २४ डिसेंबर १९९५ रोजी एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या नाटकांचे चार प्रयोग, १९९५ मध्ये ३६५ दिवसांत ४५२ प्रयोग, १९९६ मध्ये ३६५ दिवसात ४६९ प्रयोग, १८ जानेवारी २००१ रोजी एकाच दिवशी तीन नाटकांचे पाच प्रयोग आणि आतापर्यंत एकूण ९००० नाट्यप्रयोग हे विक्रम समाविष्ट आहेत.
प्रशांत दामले फॅन फाउंडेशनच्या माध्यमातून ते अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवित असतात.
## Prashant Damle
Leave a Reply