आदिवासींच्या गंभीर प्रश्नांनी कायमच नागर संस्कृतीतील मनाच्या कार्यकर्त्यांना अक्षरश: आकृष्ट केलं आहे. सातपुड्यातील आदिवासी भागात हेच समीकरण अगदी खोलवर रुजलं गेलं असून तेथील साडेचार हजार आदिवासींना घेऊन नंदूरबार-मुंबई अशी सुमारे ५०० कि.मी. “उलगुलान” पदयात्रेने विधानभवनावर जाऊन सरकारला कोंडित पकडणार्या लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे धडाडीच्या कार्यकर्त्यांपैकी एक. “उलगुलान” याचा अर्थ “सार्वजनिक उठाव” किंवा बंड असा होतो. या शब्दाचा प्रयोग बिहारातील लढवय्या आदिवासी नेता “बिरसामुंडाने” इंग्रजांविरोधात उभ्या केलेल्या चळवळीत केला गेल्याचे सांगण्यात येते. सध्याच्या परिस्थितीनुसार प्रतिभा शिंदे यांनी महाराष्ट्र सरकार विरोधात “उलगुलान” केलं आहे. असा लढवय्या स्वभाव असलेल्या प्रतिभा शिंदे या मूळ साक्री तालुक्यातील प्रतापपूरच्या बी.एस्सी व एम.एस.डब्लू सुवर्णपदक विजेत्या. महाविद्यालयीन जीवनापासूनच अनेक सामाजिक चळवळीशी त्या जोडल्या गेल्या. १९९२ मध्ये नर्मदा धरणाच्या विरोधातील संघर्षात त्यांनी सहभाग घेतला होता. मणबेलीतील केशुभाऊ तडवींच्या यंत्रणेने हात लावताच त्या विरोधात त्यांनी एल्गार पुकारला. त्यावेळी त्यांना २१ दिवसांचा कारावासही झाला. आज पर्यंत अनेक प्रश्नांना वाचा फोडत असताना वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये प्रतिभा शिंदे यांना १६० ते १७० दिवसांचा तुरुंगवास ही भोगावा लागला आहे. १९९९ मध्ये प्रतिभा शिंदे विरोधात खूनाच्या आरोपाखाली खटला भरला गेला, पण ज्या रोझवा प्लॉटवरील महिलेच्या आरोपावरून खटला दाखल झाला, त्याच महिलेनंतर न्यायालयात प्रतिभा शिंदे ह्यांच्या बाजूने साक्ष दिली, व निकाल निर्दोष लागला. “समाज को बदल डालो” असं म्हणणार्या प्रतिभा शिंदेंनी आपल्या खासगी आयुष्यात ही हे सूत्र कायम ठेवलं, व आयुष्याचा जोडीदार निवडताना संजय महाजन या तरुणाशी आंतरजातीय विवाह करुन समाजापुढे आदर्श निर्माण केला.
आदिवासींसाठी अहोरात्र झटणार्या प्रतिभा शिंदे यांनी त्यांची बोलीभाषा, रहाणीमान आत्मसात करुन त्यांच्या सुख, दु:खात ही त्या अगदी समरस झाल्या; आदिवासी समाजातील अंधश्रद्धा विरोधात त्यांनी अनेकदा जनजागृतीचे उपक्रम हाती घेतले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या “पुनर्वसन प्राधिकरण समिती”, “सरदार सरोवर नियोजन व देखरेख समिती सदस्य”, “कुपोषण निवारणार्थ गठित समिती” वर सध्या त्या कार्यरत आहेत.
Leave a Reply