प्रा. द. के. बर्वे यांचा जन्म २१ ऑगस्ट १९१७ रोजी बेळगाव येथे झाला.
द. के. बर्वे यांना जवळचे लोक भाऊ म्हणत असत. बी. ए. व एम. ए.चे त्यांचे शिक्षण मराठी प्रमुख विषय घेऊन फर्गुसन महाविद्यालयात व पुणे विद्यापीठात झाले. बी. एड. बेळगाव इथून शिक्षण महाविद्यालयातून केले. न्यू इंग्लिश स्कुल नानावाडा आणि नंतर टिळक रोड या शाळेत त्यांनी मराठीचे नामवंत शिक्षक म्हणून नाव कमावले.
मराठीवर त्यांचे जिवापाड प्रेम आणि तेवढेच प्रभुत्वही. बेळगावच्या सुप्रसिद्ध सरदार हायस्कुलमध्ये इंग्रजी माध्यमातून त्यांचे शालेय शिक्षण झाल्यामुळे त्यांचे इंग्रजीही उत्तम होते, त्याची साक्ष वोरा आणि कंपनीने त्यांच्याकडून शेक्सपिअरच्या अनेक नाटकांवरून कुमारांसाठी करून घेतलेल्या कादंबरिकांवरून येईल. प्राध्यापक म्हणून काम करताना त्यांनी ‘निवडक नवनीत’ व वामन मल्हारांच्या आश्रमहरिणीच्या समीक्षेचे ‘आश्रमहरिणीचे अंतरंग’ ही पुस्तके लिहिली.
१९५० साली ‘आंबटषौक’ हा त्यांचा प्रौढ वाचकांसाठी पहिला कथासंग्रह प्रसिद्ध झाला, पण त्यानंतर ते प्रामुख्याने वळले बालकुमार साहित्याकडे. बालवाङ्मयाची जवळजवळ सत्तर उत्तमोत्तम पुस्तके लिहून त्यांनी बालसाहित्यकार म्हणून चांगले नाव मिळवले आणि बालसाहित्यात मोलाची भर घातली. आपल्या लहानपणी वाचलेली त्यांची किती तरी सुंदर पुस्तके, कथा-कादंबरिका आजही महाराष्ट्रातील अनेकांच्या स्मरणात आहेत आणि आजच्या पिढीला ही पुस्तके उपलब्ध नाहीत याचे शल्यही मनात आहे. गुलछबू, फुलराणी, गोड गुपित, देशासाठी दर्यापार, बोलका मासा, चंद्रावर ससा, किती वाजले, नन्नी, छबुकड्या गोष्टी, डॉक्टर पोटफोडे— अशी किती तरी वाचनीय आणि गुंतवून ठेवणारी पुस्तके त्या काळात बाल वाचक आवडीने वाचत होते.
१९७६ साली सेवानिवृत्तीपूर्वी स्वेच्छानिवृत्ती घेऊन भाऊंनी पुण्यात प्रकाशन व्यवसाय जोमाने सुरू केला. तत्पुर्वी ३ ऑक्टोबर १९७१ ला दिलीपराज प्रकाशन संस्थेची सुरुवात कोल्हापूरला ते प्राध्यापक असतानाच मंगळवार पेठेतील आपल्या राहत्या घरीच प्रा. द. के. बर्वे यांनी ५० पैसे किंमत असलेल्या १६ पानी ‘छान छान नाटुकली’ या त्यांची कन्या डॉ अश्विनी धोंगडे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करून केली.
लेखनाची उर्मी, आयुष्यभरातले कडू-गोड अनुभव गाठीला आणि जात्याच असलेली प्रतिभा यांच्या जोरावर त्यांनी १९८०-८१ या दोन वर्षांत पुट्टी, पोकळी व पंचवेडी या तीन कादंबऱ्या लिहिल्या. साहित्य परिषदेच्या सभागृहात त्यांचे प्रकाशन समारंभही झाले.
Leave a Reply