प्राथमिक शिक्षणानंतर ते पुणे येथील एस. पी. कॉलेजातून बी. ए. प्रथम श्रेणीत उत्तिर्ण झाले. पुढचे एम.ए. व पी. एच. डी. चे शिक्षण त्यांनी मुंबईत घेतले. त्यांचा जन्म ७ ऑक्टोबर १९१७ रोजी सांगली जिल्ह्य़ातील मणेराजुरी येथे झाला. त्यांनी बेळगावमधील लिंगराज कॉलेजमध्ये १९४४ ते १९५० या काळात काम केले. नंतर १९७७ पर्यंत सोलापूरच्या दयानंद कॉलेज मध्ये त्यांनी २७ वर्षे ज्ञानार्जनाचे काम केले. या काळात त्यांनी ज्ञानार्जन केलेले तीन नामवंत विद्यार्थी म्हणजे लेखक आणि समिक्षक असलेले निर्मलकुमार फडकुले, साहित्यकार यु. म. पठाण आणि केंद्रिय वीजमंत्री सुशील कुमार शिंदे.
त्यांची ‘झुक झुक गाडी’ सारखी बालगीतं, तशीच ‘चालला चालला लमाणांचा तांडा’ सारखी दहावीच्या पुस्तकातील कविता लोकप्रिय होती. वि. म. कुलकर्णी यांनी निरनिराळ्या ठिकाणी भरलेल्या कविसंमेलनात सहभाग घेतला. त्यांच्या कवितांना श्रोत्यांच्या पसंतीची दादही उत्तम मिळत असे. त्यांनी लिहिलेली ‘न्याहरी’ हा संग्रह आणि ‘विसर्जन’ ही कादंबरी विशेष लोकप्रिय ठरली. त्याशिवाय पहाटवारा, कमळवेल, अश्विनी, भाववाणी, पाऊलखुणा, प्रसाद रामायण, मृगधारा हे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत.
वृत्ते व अलंकार, साहित्यदर्शन, झुपुर्झा, पेशवेबखर, साहित्यशोभा, वाचनमाला आदी ग्रंथांचे संपादनही केले. कवितेप्रमाणेच कथा, कादंबरी, टीकात्मक आणि संपादित ग्रंथ अशी त्यांची ग्रंथसंपदाही आहे.
‘गरीबांचे राज्य’ या त्यांच्या कथेचा चित्रपटही गाजला होता. त्यांच्या अनेक गीतांच्या ध्वनि मुद्रिकाही जुन्या काळात गाजल्या होत्या. राज्य सरकारने उत्कृष्ट प्राध्यापक म्हणून त्यांचा गौरव केला होता. ग. दि. मा पुरस्कार, भा. रा. तांबे बालसाहित्यिक पुरस्कार या प्रतिष्ठेच्या पुरस्काराचेही ते मानकरी होत. वि. म. कुलकर्णी यांचे १३ मे २०१० रोजी निधन झाले.
Leave a Reply