महाराष्ट्राचे ‘लाडके व्यक्तिमत्त्व’, ‘महाराष्ट्राचे आनंदयात्री’, ‘महाराष्ट्राचे भूषण’, ‘महाराष्ट्राचा अष्टपैलू कलावंत’ असा महाराष्ट्राचा अभिमान असणारे पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे.
८ नोव्हेंबर १९१९ रोजी मुंबईतील गावदेवी इथे पुलंचा जन्म झाला. पार्ले टिळक विद्यालयातून शिक्षण पूर्ण झाल्यावर १९३६ साली पुलं मुंबईतील इस्माईल युसुफ महाविद्यालयात दाखल झाले. त्यानंतर गव्हर्मेंट लॉ कॉलेजमधून १९४१ साली एल. एल. बी. ची पदवी संपादन केली.
प्राप्तीकर विभागात कांही काळ नोकरी केल्यानंतर पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेऊन १९४४ साली बी. ए. व नंतर एम. ए. पर्यंत शिक्षण पूर्ण केले. १९४६ साली त्यांचा सुनीताबाईंशी विवाह झाला. नभोवाणीवर १९३८ पासून छोट्या मोठ्या नाटिकातून त्यांचा सहभाग होता. पुलंनी लिहिलेलं पहिलं व्यक्तिचित्रण ‘भय्या नागपूरकर’ ‘अभिरूची’ मधून प्रकाशित झालं. त्यावेळी ‘सत्यकथा’मधून प्रसिद्ध झालेल्या ‘जिम आणि गंगाकुमारी’ या कथेने रसिकांच्या मनात स्थान निर्माण केलं.
फर्ग्युसन महाविद्यालयात असतानाच त्यांनी नाट्यक्षेत्रात पाऊल ठेवले. चितामणराव कोल्हटकरांच्या नाट्यसंस्थेच्या नाटकातून त्यांनी भूमिका केल्या. १९४८ साली ‘तुका म्हणे आता’ हे नाटक आणि ‘बिचारे सौभद्र’ हे प्रहसन लिहिलं.
१९४७ साली चित्रपट क्षेत्रात त्यांचा प्रवेश झाला. ‘वंदेमातरम्’, ‘मानाचं पान’, ‘देव पावला’, ‘दूधभात’, ‘पुढचं पाऊल’, ‘जरा जपून’, ‘गोकुळचा राजा’ इत्यादी सिनेमातून त्यांचा पटकथा, गीत, लेखन, संगीत, अभिनय असा अनेक प्रकारे सहभाग होता. ‘गुळाचा गणपती’ चित्रपटाची निर्मिती त्यांचीच होती. त्यानंतर नाट्य क्षेत्राकडे वळलेल्या पुलंनी ‘तुझे आहे तुजपाशी’, ‘सुंदर मी होणार’, ‘अंमलदार’, ‘ती फुलराणी’, ‘तीन पैशाचा तमाशा’ अशी सर्वांगसुंदर नाटकं मराठी रंगभूमीला दिली. ‘बटाट्याची चाळ’, ‘असा मी असा मी’, ‘वार्यावरची वरात’ यासारखे एकपात्री प्रयोगही लोकप्रिय झाले.
वाचकांमध्ये लोकप्रिय झालेल्या जीवनस्पर्शी शैलीत पुलंनी साहित्यनिर्मिती केली. ‘व्यक्ती आणि वल्ली’, ‘गणगोत’, ‘गुण गाईन आवडी’ आणि ‘मैत्र’ हे चार व्यक्तिचित्रांचे संग्रह, ‘अपूर्वाई’, ‘पूर्वरंग’ ही प्रवासवर्णने तर ‘वंगचित्रे’, ‘खोगीरभरती’, ‘गोळाबेरीज’, ‘खिल्ली’ हे ललित लेखसंग्रह तसेच ‘वयम् मोठम् खोटम्’ ‘नवे गोकुळ’ ही बालनाट्य. कुमारांसाठी लिहिलेलं महात्मा गांधींचे चरित्र, ‘एका कोळीयाने’ ही कादंबरी, ‘कान्होजी आंग्रे’ अनुवादित चरित्र इत्यादी अनेक वैविध्यपूर्ण साहित्याची निर्मिती म्हणजे मराठी माणसाला दिलेला अनमोल असा ठेवाच आहे.
१९५८ ते ६३ अशी सलग सहा वर्षे राज्य शासनाचे पुरस्कार त्यांना लाभले. साहित्य अकादमीचा ‘व्यक्ति आणि वल्ली’ला पुरस्कार मिळाला. भारत सरकारने ‘पद्मश्री’ किताब देऊन गौरविले. १९७४ सालच्या सुवर्णमहोत्सवी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले.
रसिकांचे उदंड प्रेम आदर मिळविणार्या पुलंना १२ जून २००० रोजी पुण्यात देवाज्ञा झाली.
पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांच्यावरील मराठीसृष्टीवरील लेख.
पु. ल. देशपांडे (8-Nov-2016)
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्त्व पु.ल.देशपांडे (12-Jun-2017)
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्त्व पु. ल. देशपांडे (8-Nov-2018)
## Pu.La.Deshpande
Leave a Reply