MENU

भावे, पुरूषोत्तम भास्कर (पु.भा.भावे)

Bhave, Purushottam Bhaskar (Pu Bha Bhave)

Purushottam Bhave

मराठी साहित्यामधील प्रतिभासंपन्न लेखक, उत्कृष्ठ वक्ते, व अष्टपैलू व्यक्तिमत्व अशी ओळख असलेले पुरूषोत्तम भावे यांचा जन्म धुळे येथे जन्म झाला. हृद्यस्पर्शी कथा, चित्तवेधक प्रवासवर्णने, संवेदनशील व भावस्पर्शी नाटके, ओघवते ललितगद्य, चिंतनात्मक लेख इत्यादी विविध साहित्यप्रकार त्यांनी आपल्या सिध्दहस्त लेखणीमधून हजारो मराठी वाचकांच्या आठवणींच्या पानांवर चिरायू केले आहेत. मराठी नवकथेचे जनक, असे त्यांना मराठी साहित्यपटलावरती आदराने संबोधले जाते.

जुलै १९३१ साली किर्लोस्कर खबरमध्ये त्यांची ‘फुकट’ ही कथा प्रकशित झाली. तथापि त्यांचे लेखणीचे व प्रतिभेचे सामर्थ्य प्रगट झाले ते त्यांच्या वृत्तपत्रीय लेखनामुळे. हिंदुत्वनिष्ठ विचारसरणीचा पुरस्कार करणाऱ्या नागपूरच्या सावधान या साप्तहिकातून त्यांचे लेख प्रसिद्ध होताच, त्यांतून प्रगट होणार्‍या भाषासौंदर्याने व तेजस्वीपणाने वाचक मुग्ध होऊन गेले. अच्युत बळवंत कोल्हटकर व शिवराम महादेव परांजपे ह्या दोन प्रसिद्ध शैलीकार साहित्यिकांच्या लेखनगुणांचे मनोज्ञ रसायन भावांच्या शैलीतून प्रगट झाले. “आदेश“ या त्यांच्या स्वतःच्या साप्ताहिकातूनही त्यांचे अनेक चित्तवेधक लेख प्रसिद्ध झाले आहेत. मूलतःप्रचारी स्वरूपाचे स्वरूपाचे असूनही त्यांचे अनेक लेख वाङ्‍मयगुणांनी मंडित झालेले दिसतात. त्याचे कारण भावेंची विशिष्ट लेखनशैली हेच होय. “रक्त आणि अश्रू“ हा त्यांचा लेखसंग्रह मराठी निबंधवाङ्‍मयाताही अद्वितीय ठरला आहे.

“वाघनखे“ , “विठ्ठला पांडुरंगा“ , “अमरवेल“, “रांगोळी“, “असे एकुण चौदा लेखसंग्रह प्रसिद्ध आहेत. १९७४ साली प्रकाशित झालेल्या “स्मरणी हा त्यांनी लिहिलेल्या व्यक्तिचित्रांचा संग्रहही उल्लेखनीय आहे. त्याचप्रमाणे “सावल्या“, “प्रतारणा“, “नौका“, “घायाळ“, “ध्यास“,“मुक्ती“ अशा एकाहून एक सरस कथा त्यांनी लिहिल्या.

तसेच त्यांच्या “व्याध“, “पिंजरा“, “रोहिणी“ अशा कादंबर्‍यांनादेखील जाणकार वाचकांकडून कौतुकाची थाप मिळाली होती. “स्वामिनी“, “विषकन्या“, “महाराणी पद्मिनी“ ही नाटके आणि “सौभाग्य“, “माझा होशील का?“ या दोन चित्रपटांच्या कथा लिहून ते मोठया पडद्यावरील प्रेक्षकांच्या भेटीस आले होते.

भावे हे हिंदुत्वनिष्ठ होते. स्वातंत्र्यवीर सावरकर हे त्यांचे आदर्श होते. हिंदुमहासभा या राजकीय पक्षाचे ते काही काळ भावे हे सक्रिय कार्यकर्तेही होते आणि सनातन भारतीय संस्कृतीचे व जीवनमूल्यांचे उपासक व प्रवक्ते देखील होते.

अहमदनगर येथे १९६४ साली भरलेल्या ४६व्या नाटय संमेलनाचे ते अध्यक्ष होते. भावे यांनी साहित्य क्षेत्राला दिलेल्या योगदानाची दखल घेऊन पुणे येथे १९७७ साली आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली होती .

“थमपुरूषी एकवचनी“ हे त्यांचे आत्मचरित्रही प्रसिद्ध असून त्यांच्या व्यक्तीमत्त्वाची व आयुष्य कसे घडले हे समजून घेण्याच्या दृष्टीने उपयुक्त असे आहे.

१३ ऑगस्ट १९८० रोजी पु.भा.भावे यांचे मुंबईत निधन झाले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*