कॉमन मॅन’चे जनक आणि ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांचा जन्म २३ ऑक्टोबर १९२४ रोजी म्हैसूर येथे झाला.
रासीपुरम कृष्णस्वामी लक्ष्मण म्हणजेच आर. के. लक्ष्मण यांनी ‘द टाइम्स ऑफ इंडिया’ वृत्तपत्रातून काढलेली व्यंगचित्रे खूप गाजली होती. ‘कॉमन मॅन’ या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून त्यांनी भोवतालच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींवर मार्मिक भाष्य केले होते. कॉमन मॅन हे त्यांचे गाजलेले व्यंगचित्र.
भारतीय व्यंगचित्रकलेला त्यांनी नवी ओळख मिळवून दिली. प्रारंभीच्या काळात त्यांनी हिटलर, मुसोनिली, नेहरू, गांधी अशा प्रसिद्ध व्यक्तींची व्यंगचित्रे काढली होती. महात्मा गांधीपासून अटलबिहारी वाजपेयी, सोनिया गांधीपर्यंत राजकीय व्यक्तींच्या अनेक पिढया त्यांनी रेखाटल्या आहेत.
“यू सेड इट” नावाने त्यांनी फक्त व्यंगचित्र असलेले ‘टाइम्स ऑफ इंडिया’ मध्ये एक सदर सुरू केले. दैनिकाच्या मुखपृष्ठावर आजतागायत नियमितपणे प्रकाशित होत असलेले हे सदर लोकांना खूप आवडते. त्यांनी रेखाटलेल्या व्यंगचित्रांची पुस्तके म्हणजे भारतीय समाजमनाचा एक ऐतिहासिक ठेवाच आहे.
जर्नालिझम, लिटरेचर अँड क्रिएटिव्ह कम्युनिकेशन आर्टबद्दल त्यांना रॅमन मॅगसेसे पुरस्काराने १९८४ मध्ये गौरवण्यात आले. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा गोदावरी गौरव पुरस्कार प्राप्त झाला होता. तसेच मराठावाडा विद्यापीठाने त्यांना डी. लिट. ही सन्माननीय पदवी दिली होती. आर. के. लक्ष्मण यांनी The Tunnel of Time : An Autobiography या नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे.
आर. के. लक्ष्मण यांचे २६ जानेवारी २०१५ रोजी निधन झाले.
Leave a Reply