राहुल देशपांडे

राहुल देशपांडे हा मराठी शास्त्रीय संगीतसृष्टी मधील एक ताजा व भावपुर्ण आवाज. आज अनेक मराठी गायक भाव गीते, भक्ति गीते व हिंदी संगीताच्या वाटा चोखंदळत असताना राहुल सारखे गुणी व मेहेनती कलावंत त्या तुलनेने दुर्लक्षित राहिलेल्या मराठी शास्त्रिय संगीताची समृध्द दोर घट्ट करण्याचे काम चोखपणे करीत आहेत. मध्यंतरीच आपण सर्वांनी त्याचा बालगंधर्व या गाजलेल्या चित्रपटामध्ये मध्ये अंगावर रोमांच आणणारा, मंतरलेला आवाज ऐकला तेव्हा त्याच्यातील परिपक्व व खानदानी गायकीची ओळख तर आपल्याला पटलीच शिवाय त्याला उत्तम अभिनय देखील जमतो हे सत्य सुध्द आपल्यासमोर आले.

आज तो महाराष्ट्रातल्या काही निवडक तयार व आघाडीच्या शास्त्रीय गायकांपैकी एक म्हणून गणला जातो व आपल्या गोड व सच्च्या गळ्याने तसेच सुरांवरील हुकूमतीने त्याने सर्व रसिकजनांवर जादु केली आहे.

राहुल देशपांडेचा जन्म १९६९ मध्ये झाला व तो जन्माने पुणेकर आहे. तो विख्यात गायक वसंतराव देशपांडे यांचा नातु असून पटियाला घराण्यापासून त्याची गायकी जन्मलेली असल्यामुळे त्याच्या नसानसांनध्येच गाण भिनलय अस म्हणावयास हरकत नाही. सुरूवातीचा काही काळ राहुलने पंडित गंगाधरबुवा पिंपळखेर यांच्याकडे व नंतर डॉक्टर मधुसूदन पटवर्धन यांच्याकडे संगीताचे प्राथमिक शिक्षण घेतले. सुरूवातीला त्याचा ओढा गाण्यापेक्षा तबल्याकडे अधिक होता. त्याने तालांचे सखोल शिक्षण पंडित सुरेश सामंत यांच्याकडे घेतले. त्यानंतर एक वेगळीच गोष्ट घडली की ज्यामुळे त्याच्या आयुष्याला निराळेच वळण लागले. पंडित कुमार गंधर्वांच्या गायकीचा आभ्यास करायला जेव्हा राहुलने सुरूवात केली तेव्हा त्याच्या अंतरंगात दडलेल्या गायकाने डोके वर काढले. मग त्याने शास्त्रीय संगिताची आभ्यासपुर्ण साधना करून आपल्यामधील गायकाला खोलवर रूजवायला सुरूवात केली. त्यासाठी राहुलने मुकूल शिवपुत्र, उशाताई चिपालकट्टी यांच्याकडून मार्गदर्शन घेतले.

आजपर्यंत राहुलने त्याच्या कार्यक्रमांमध्ये शास्त्रीय रागांपासून ते ठुमरी, खयाल, दादरा, नाट्यगीत, भजन, गझल, भावगीत अशा मनाच्या विवीध अवस्थांना व भावनांना वाहून नेणार्‍या गीतप्रकारांना सारख्याच तन्मयतेने आपलस केल आहे. पण त्याची खरी नाळ ही हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताबरोबर जोडली गेली आहे. राहुल हा जसा आपल्या कमावलेल्या आवाजाने श्रोत्यांवर भुरळ पाडत असतो तसे त्याचे विचारही सुधारणावादी व इतरांपेक्षा फार वेगळे आहेत.

वैयक्तिक संगीत घराण्यांचा जरी तो आदर करत असला तरी पारंपारिक घराण्यांचा विशिष्ठ गायकी वगळून प्रेक्षकांना नव काहीतरी देण्याचा त्याचा कल असतो. तसच उत्तम गायक होण्यासाठी कुठल्यातरी घराण्याच असण आवश्यक असतं हेही तो मानत नाही. गायक होण्यासाठी लागतात ते कठोर परिश्रम, हळव मन व आपल्या कलेप्रती असलेली निष्ठा व ममता, या ठाम मतांचा तो आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*