राजा बढे

कळीदार कपूरी पान’, ‘चांदणे शिंपीत जाशी’, ‘जय जय महाराष्ट्र माझा’ अशा दर्जेदार काव्य रचना करणारे कवि राजा बढे यांचा जन्म १ फेब्रुवारी १९१२ रोजी झाला. राजा बढे हे नावाप्रमाणंच राजा-माणूस होते. राजा बढे हे नामवंत गीतकाव्य आणि भावकाव्य लिहिणारे कवी… रुबाबदार,प्रसन्न व्यक्तिमत्त्व, राजस छबी, कुसुमकोमल भावनांना शब्दबद्ध करणारा, कोमलवृत्तीचा हा प्रतिभासंपन्न कवी, पण मनात देशभक्तीचा स्फुलिग सांभाळणारा राष्ट्रप्रेमी म्हणजे राजा बढे. आजच्या पिढीला कदाचित राजा बढे हे नावसुद्धा माहीत नसेल. परंतु ज्यांच्या गीतांची सुदैवाने चिरफाड न होता त्यावर रिमिक्सचा मुलामा चढलेला नाही, अशी गीते राजा बढे यांच्या नावावर आहेत. राजा बढे यांचे जन्म नागपूरचा.

१९३५ मध्ये त्यांनी पंजाब मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली. पुण्याच्या दैनिक ‘सकाळ’ मध्ये संपादकीय विभागात त्यांनी नोकरी केली. नागपूरच्या दैनिक ‘महाराष्ट्र’ मध्ये एक वर्ष ते सहसंपादक होते. त्याचवेळी ‘वागीश्वरी’च्या संपादक मंडळात ते कार्यरत होते. पुढे साप्ताहिक ‘सावधान’ मध्ये मावकर-भावे यांच्यासोबत त्यांनी कार्य केले. दरम्यान कॉलेज करून पदवी प्राप्त करण्याचा त्यांचा प्रयत्न अपुरा राहिला. त्यांनी बरचसं स्फुटलेखन “कोंडिबा’ या टोपणनावानं केलं. वयाच्या सतरा-अठरा वर्षांपासूनच कविता लिहू लागले.

‘संत बहिणाबाई,’ ‘गळ्याची शपथ’ या चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केले. १९५६ ते १९६२ या कालखंडात ते आकाशवाणीवर ‘निर्माता’ म्हणून कार्यरत होते. आपल्या वाङ्मयीन अभिरुचीला पोषक ठरतील, अशा व्यवसायांसी धरसोड ते आयुष्यभर करीत राहिले, तरी आपले कवित्व ते सतत सांभाळून होते. “चांदणे शिंपीत जाशी, चालता तू चंचले’, “दे मला गे चंद्रिके प्रीती तुझी’, “प्रेम केले काय हा झाला गुन्हा?’ इत्यादी सुरेल भावगीतं त्यांनी लिहिली. स्त्रियांचे मनोभाव आकर्षकरीत्या शब्दबद्ध करण्यात बढे सिद्धहस्त होते. “वाट कशी चुकले रे’, “कधी न पाहिले तुला’, “होशी तू नामानिराळा’, “काय कोणी पाहिले,’ “मला मोहू नका’ इत्यादी गीतांमधून व्याकुळता, विरहार्तता, मीलनातुरता असे मनोभाव त्यांनी नाट्यपूर्ण रीतीनं चितारले आहेत.

ज्येष्ठ दिवंगत कविवर्य वा. रा. कांत यांनी बढे यांच्याविषयी म्हटलं आहे:-
“आपल्या कवितेचा धर्म ओळखून शेवटपर्यंत मनाला आल्हाद देणाऱ्या कविता लिहिण्याचं ‘चांद्रव्रत’ त्यांनी निष्ठेनं पार पाडलं, यातच त्यांची थोरवी आहे….हा कवी जन्मभर चांदणं शिंपीत जगला आणि चांदणं शिंपीत शिंपीत अचानक निघून गेला. ह्या “चांद्रव्रती’ची आठवण विझणं अशक्य!!” राजा बढे यांचे ७ एप्रिल १९७७ रोजी निधन झाले.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*