राजा गोसावी

अभिनेता

आपल्या नाचगाण्याच्या वेडापायी शाळेच्या चार इयत्ता कशाबशा पार पाडून राजा गोसावी यांनी मुंबई गाठली. त्यांचा जन्म २८ मार्च १९२८ रोजी साताऱ्यातील सिद्धेश्वर कुरोली येथे झाला.त्यांनी ऑफिस बॉय म्हणून मास्टर विनायकांच्या कंपनीत काम केले. दामुअण्णा मालवणकर हे त्यांचे गुरू. दामुअण्णांच्या प्रभाकर नाटय़मंदिरात ते प्रॉम्टरची नोकरी करत. याच कंपनीच्या ‘भावबंधन’ या नाटकाद्वारे मराठी रंगभूमीशी त्यांचे भावबंध जुळले ते कायमचेच. ‘अखेर जमलं’ या चित्रपटातील त्यांची भूमिका पाहून दिग्दर्शक राजा परांजपेंनी ‘लाखाची गोष्ट’ या चित्रपटात त्यांना घेतलं. हा चित्रपट त्यांच्या दृष्टीने लाख मोलाचा ठरला. ‘लाखाची गोष्ट’ हा चित्रपट पुण्याच्या भानुविलास थिएटरमध्ये प्रदर्शित झाला, तेव्हा तिकीट फाडणाराच चित्रपटाचा नायक असल्याचे पाहून प्रेक्षक चकीत झाले. ‘लाखाची गोष्ट’ प्रदर्शित झाला त्या वेळी मा.राजा गोसावी ‘भानुविलास टॉकीज’मध्ये बुकिंग क्लार्क होते. स्वत:च्या सिनेमाची तिकिटे स्वत:च विकत असत आणि काही वेळा त्यांनी ब्लॅकमध्ये विकली. जागतिक सिनेमा इतिहासातला हा अचाट प्रकार.

१९५० ते १९७० पर्यंतची दोन दशके मा.राजा गोसावी यांनी आपल्या अभिनयाने अक्षरश: गाजवली. जयश्री गडकर, स्मिता, रेखा, सीमा, नीलम अशी विविध नायिकांची साथ मा.राजा गोसावी यांना लाभली.

मा.राजा गोसावी यांनी अडीचशे चित्रपटातून त्यांनी काम केले. केवळ विनोदी नव्हे तर गंभीर भूमिकाही त्यांनी केल्या. ‘हा खेळ सावल्यांचा’ या चित्रपटातील त्यांची खलनायकाची भूमिका विशेष लक्षात राहिली. मा.राजा गोसावींच्या अभिनयातील सहजता, मुद्रेवरील भाव व संवादफेकीचं अचूक टायमिंग अगदी दाद देण्यासारखं होतं.

मा.राजा गोसावी यांना मराठीतील ‘दिलीपकुमार’ म्हणत असत.

मा.राजा गोसावी यांचे २८ फेब्रुवारी १९९८ रोजी निधन झाले.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*