अमोघ वाणी लाभलेला वक्ता, कवी, ललित लेखक, समीक्षक, विचारवंत ही ओळख राम शेवाळकर यांची.
अमरावती जिल्ह्यातील अचलपूर या गावी २ मार्च १९३१ रोजी त्यांचा जन्म झाला. प्राथमिक शिक्षण नगरपालिका शाळा, अचलपूर येथे झाले. अचलपूर येथीलच शासकीय माध्यमिक विद्यालय येथे माध्यमिक शिक्षण आणि सी. टी. हायस्कूलमधून मॅट्रिकची परीक्षा १९४८ साली ते उत्तीर्ण झाले. बी. ए. ची पदवी अमरावतीच्या विदर्भ महाविद्यालयातून तर नागपूर महाविद्यालयातून ते एम. ए. झाले. मराठीचे प्राध्यापक आणि नंतर वणी येथील महाविद्यालयाचे प्राचार्यपदही त्यांनी भूषविले.
विद्वत्तेचा आणि वाणीचा वारसा त्यांना त्यांच्या पणजोबांकडून आणि वडिलांकडून मिळाला. शेवाळकरांचे वडील कीर्तनोपयोगी आख्याने लिहित. त्यामुळे लेखनाचा वारसा आणि वक्ता दशस्रहस्रेषु अशी अमोघ वाणी त्यांना पूर्वजांकडून मिळालेली देणगीच.
काव्याची त्यांना लहानपणापासूनच आवड होती. बालवयातच ते वृत्तबद्ध रचना करीत असत. प्राचीन आणि आधुनिक वाङ्मयाचा त्यांचा सखोल अभ्यास आहे. त्यातील रसास्वाद घेण्याच्या वृत्तीमुळे त्यांच्यातला समीक्षक विकसित झाला. ‘रेघा’, ‘असोशी’, ‘अंगारा’ हे त्यांचे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांनी ललित स्वरूपाचे लेखनही विपुल केले आहे. ‘त्रिदल’, ‘अग्निमित्र’, ‘रुचीभेद’, ‘सारस्वताचे झाड’, ‘आकाशाचा कोंब’, ‘अमृतझरा’, ‘पूर्वेची प्रभा’, ‘देवाचे दिवे’, ‘तारकांचे गाणे’ इ. त्यांचे लेख आणि ललित लेखसंग्रह. तसेच ‘कालिदासाचे शाकुंतल’, ‘भासाचे स्वप्न’, ‘मालविकाग्नीमित्र’ इ. संस्कृत नाटकांचे आस्वाद देणारे ग्रंथ त्यांनी लिहिले. या व्यतिरिक्त संपादित तसेच काही स्वतंत्र लेखांची त्यांची पन्नासहून अधिक पुस्तके प्रसिद्ध आहेत. ‘अक्षरमाधव’, ‘शिक्षणविचार’, ‘यशोधन’, त्रिविक्रम (खंड १, २ व ३)’ इ. त्यांनी संपादन केलेले ग्रंथ आहेत. ‘श्रीवत्स’ नावाच्या वार्षिक अंकाचे प्रकाशन व संपादन राम शेवाळकर यांनी कांही वर्ष केले. कवी गु. ह. देशपांडे यांच्या कवितेचे संपादन ‘घटप्रभा’ या नावानी त्यांनी केले.
महाराष्ट्राला राम शेवाळकर यांची ओळख म्हणजे उत्तम वक्ता ही सुद्धा आहे. राम शेवाळकर यांचे व्याख्यान आणि श्रोत्यांनी तुडुंब भरलेले सभागृह हे जणू समीकरणच झालेले होते. श्रोत्यांना विचार देणारा वक्ता अशीच त्यांची प्रतिमा होती. आधुनिक काळानुरूप त्यांच्या भाषणांच्या ऑडिओ, व्हीडीओ सीडी ही बाजारात उपलब्ध आहेत.
१९७८ साली भंडारा येथे झालेल्या विदर्भ साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. तर १९९४ साली पणजी (गोवा) येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे.
३ मे २००९ रोजी नागपूर येथे त्यांचे निधन झाले.
राम शेवाळकर यांच्याबद्दल विकिपिडियावरील पान
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
## Ram Shewalkar
Leave a Reply