(1814-18 एप्रिल 1859)
इंग्रजांविरुध्द मुकाबला करणारा 1857 च्या उठावातील एक प्रसिध्द सेनानी. संपूर्ण नाव रामचंद पांडुरंग भट. टोपे या त्याच्या उपनावाबद्दल तज्ञांत एकमत नाही. तथापि तत्संबंधी दोन भिन्न मते आहेत ः(1) बाजीराव पेशव्याने त्यास मूल्यवान अशी टोपी दिली व ती तो अत्यंत जपत असे. (2) काही दिवस त्याने ईस्ट इंडिया कंपनीच्या तोफखान्यावर काम केले. त्यावेळेपासून हे नाव रुढ झाले असावे. प्रथम तो पेशव्यांकडे तोफखान्यावर नोकरीस होता. सु. 30 वर्षे त्याने मध्य भारतात अनेक संस्थानिकांकडे तोफखान्यावर काम केले. पुढे तो ब्रम्हवर्त येथे नानासाहेब पेशव्यांकडे नोकरीस होता.
त्याने 1857 मध्ये सैन्याची जमवाजमव करुन नानासाहेब, लक्ष्मीबाई वगैरेंच्या मदतीने इंग्रजांशी अनेक ठिकाणी मुकाबला केला, काही महत्वाची स्थळे जिंकली आणि ग्वाल्हेर येथे नानासाहेबांची पेशवे म्हणून द्वाही फिरवली . 1857 च्या उठाव मीरत, दिल्ली, लाहोर, गारा, झांशी, ग्वाल्हेर इ. ठिकाणी पसरला. उठावात तात्याने नानासाहेब पेशव्यांना संपूर्ण सहकार्य देऊन नानासाहेबांबरोबर वाराणसी, अलाहाबाद इ. ठिकाणी दौरे काढले जून 1857 मध्ये जनरल हॅवलॉकने कानपूरला वेढा दिला. त्या वेळी तात्त्याने महत्वाची कामगिरी बजावली, परंतु तात्या, रावसाहेब, ज्वालाप्रसाद यांचा 16 जुलै 1857 रोजी पराभव होताच, तात्या व इतर मंडळी अयोध्येला गेली. त्यांनी कानपूरवर हल्ला करण्यासाठी विठूरला मुक्काम ठोकला, परंतु तेवढयात 16 ऑगस्ट 1857 रोजी हॅवलॉक विठूरवर चालून गेला. तात्या व त्याचे सहकारी शौर्याने लढूनही इंग्रजांचाच जय झाला. शिंद्यांचे सैन्य आपल्या बाजूला वळवून घेण्यासाठी तात्या व रावसाहेब ग्वाल्हेरला गेले. तेथून पुढे जाऊन त्यानी काल्पी येथे छावणी केली. 1857 च्या नोव्हेंबरमध्ये तात्याने कानपूरवर चढाई करुन जनरल विनडॅमचा पराभव केला आणि कानपूरवर अचानकपणे हल्ला करुन तात्यांचा पराभव केला. कानपूर जिंकण्याचा तात्यांचा प्रयत्न फसला, तरी इंग्रजांना हैराण करण्याची त्याची जिद्द कमी झाली नाही.
Leave a Reply