ज्येष्ठ रंगकर्मी रामनाथ थरवळ यांचा जन्म २० नोव्हेंबरला कोकणातील गुहागर तालुक्यातील आबलोली गावी येथे झाला.
रामनाथ थरवळ यांचे बालपण आणि प्राथमिक शिक्षण आबलोली गावातच झाले. आठवीपासून ते पुढील शिक्षणासाठी जरी मुंबईला आले असले तरी नाटकाचे बालधडे त्यांनी गावातच गिरवले होते. त्यांचे वडील गावी हौशी नाटकांतून काम करायचे. इथून त्यांना नाटकाशी परीचय झाला. या प्राथमिक परिचयातून त्यांनी शाळेत असताना शालेय उपक्रम म्हणून नाटकांत कामे केली. पण ते सारे हौसेखातर होते. पुढे जाऊन या वयातील मुलांना आपण शिकवणार आहोत, याची त्यांना तेव्हा सूतराम कल्पना नव्हती.
पण त्यांना खरे मार्गदर्शन लाभले ते आविष्कार, अभिजात, रुपवेध, अभिव्यक्ती, थिएटर इन नेट, पृथ्वी थिएटर, बालभवन अशा संस्थांतून विजया मेहता, सुलभा व अरविंद देशपांडे, दामू केंकरे, पंडित सत्यदेव दुबे, रेखा सबनीस अशा मान्यवरांशी संबंध आला; त्यांचे मार्गदर्शन मिळत गेले. रामनाथ थरवळ यांची कलाजडणघडण होत गेली.
रामनाथ थरवळ यांनी १९७३ साली पहिले नाटय़शिबिर घेतले. रत्ना पाठक-शहा यांच्या मामांच्या बालोद्यानात ते झाले. सुलभा देशपांडे यांच्या आग्रहास्तव ते सुरू झाले होते.१९७४ साली ते जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे पदवीधर झाले.
नाना पाटेकर, सतीश पुळेकर आणि रामनाथ थरवळ असे त्या पहिल्या बालनाटय़ातील मोठे कलाकार. पुढे बालनाटय़ शिबिरांसाठी रामनाथ थरवळ महाराष्ट्रभर फिरले. गोवा, फैजपूर असाही त्यांचा प्रवास झाला. पण ते खऱ्या अर्थाने रमले ते जवाहर बालभवनात.१९८१ ते १९९० हा दहा वर्षांचा कालावधी त्यांनी बालभवनात घालवला. बालकांसमवेत घालवला. तिथे मुलांना शिकवता शिकवता तेही शिकत गेले.
त्यात दाढीवाला बाबा’, चोराच्या मनात चार आणे’, अक्षरांची शाळा’, श्यामची आई’, बालपणीचे बाबासाहेब आंबेडकर’, कहाणी एका गुलाबाची’, दोन मित्र’ अशी तब्बल ५० नाटके केली. यातील दोन मित्र’ या नाटकाचा रौप्य महोत्सवी प्रयोग १९८४ साली साहित्य संघ मंदिरात होता. त्यावेळी विजय तेंडुलकर यांच्या उपस्थितीत थरवळ यांच्या कलाघर’ या संस्थेची पायाभरणी झाली.
पृथ्वी थिएटरमधील १७ वर्षांच्या कालावधीनंतर १९९३ साली रामनाथ थरवळ यांनी ठाण्यात स्वतःची कार्यशाळा सुरू केली. ती कार्यशाळा आजही सुरू आहे. तिथे ते अजूनही छोटीमोठी नाटके सादर करतात. त्यांच्या या कार्यशाळेतून शिकून गेलेल्या कलाकारांची यादी तशी मोठी आहे. विद्या बालन, निशिगंधा वाड, किशोरी शहाणे, सुमित राघवन, पंकज विष्णू, रसिक ओक जोशी, विशाखा सुभेदार, अतुल काळे, तारका पेडणेकर, दिपक वीज, बॉबी वीज ही त्यातली काही नावे. या शिबिरार्थीं पैकी अनेकजण डॉक्टर, वकील, इंजिनिअर या पेशांतही स्थीरावले आहेत.
रामनाथ थरवळ यांचे १९९५ साली अमेरिकेतील शिकागो येथेही नाटय़शिबिर झाले होते. त्यालाही उदंड प्रतिसाद लाभला होता. रामनाथ थरवळ यांनी बालकांसाठी केवळ कार्यशाळा घेतल्या, त्यांच्यासाठी नाटके लिहिली, ती बसवली एवढेच केले नाही. चांगले काम करण्यासाठी चांगले वाचन हवे, या मताचे थरवळ आहेत. म्हणून त्यांनी मुलांसाठी ढिशाँव ढिशाँव’ हे अर्धवार्षिक चालवले.
Leave a Reply