ज्येष्ठ अभिनेते रवि पटवर्धन यांचा जन्म ६ सप्टेंबर १९३७ रोजी झाला.
ब्लॅक अँड व्हाइट चित्रपटाच्या जमान्यात रवी पटवर्धन यांनी अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. आपल्या उमेदीच्या काळात त्यांनी रिझर्व्ह बँकेत नोकरी करून अभिनय श्रेत्रात पाऊल ठेवले. १९६४ मध्ये राज्य नाट्य स्पर्धेत गो.म.पारखी यांचे ‘कथा कोणाची व्यथा कुणाला’हे नाटक सादर झाले. त्यात रवी पटवर्धन यांनी अभिनय केला होता.
यशवंत पगार यांच्या ‘श्रीरंगसाधना’ या नाट्यसंस्थेतर्फे त्याच सुमारास हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर येणार होते. त्यांनी नाटकाचा पहिला प्रयोगही जाहीर केला होता, पण काही कारणाने त्यांचे नाटक बसले नव्हते. दरम्यान नुकताच या नाटकाचा प्रयोग केला असल्याने ‘तुम्ही आमच्या नाट्यसंस्थेतर्फे प्रयोग सादर कराल का’ अशी विचारणा पगार यांनी केल्यावर बॅंकेचाच कलाकार संच घेऊन पटवर्धनांनी हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर केले.
रवी पटवर्धन या नाटकात ‘मुकुंद प्रधान’ ही मुख्य भूमिका करत होते. हे त्यांचे पहिले व्यावसायिक नाटक होय.
१९७० मध्ये ‘नाट्यनिकेतन’च्या वसंत सबनीस यांनी लिहिलेल्या आणि मो.ग. रांगणेकर यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘हृदयस्वामिनी’ नाटकात पटवर्धनांनी काम केले, त्यावेळी नाटकात त्यांच्यासोबत शांता जोग होत्या. इंडियन नॅशनल थिएटरने वि.वा. शिरवाडकर यांनी लिहिलेले ‘बेकेट’ हे नाटक रंगभूमीवर आणले. सतीश दुभाषी त्याचे दिग्दर्शक होते. त्या नाटकात रवी पटवर्धनांना ‘बेकेट’ची भूमिका मिळाली. दुभाषी त्यात ‘हेंन्रीद’ करायचे. या नाटकानंतर वि.वा. शिरवाडकर यांच्याशी स्नेहसंबंध जुळले. पुढे त्यांच्या ‘कौंतेय’, ‘आनंद’, ‘वीज म्हणाली धरतीला’ या नाटकांतून भूमिका करायला मिळाल्या.
‘अरण्यक’ हे नाटक त्यांनी पहिल्यांदा १९७४ मध्ये रत्नाकर मतकरींच्या बरोबर केले आणि वयाच्या ८४ व्या वर्षीही ते ह्या नाटकात तीच धृतराष्ट्राची भूमिका करत असत. वयपरत्वे येणाऱ्या विस्मरणाच्या मोठ्या धोक्यावर विजय मिळवून, मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्यांनी श्याम मानव यांच्याकडून स्वसंमोहन शास्त्र शिकून घेतले होते. या विषयावरच्या साहित्यावर खूप अभ्यास केला व त्या शास्त्राचा वापर करून स्वतःच्या अनेक व्याधींवर मात केली. शिवाय आत्मविश्वास हरवलेल्या व्यक्ती आणि व्याधिग्रस्तांवरही रवी पटवर्धन यांनी या उपचारपद्धतीचा वापर केला व त्याचा त्यांना खूप फायदा करून दिला.
रवी पटवर्धनांनी अग्गंबाई सासूबाई, आमची माती आमची माणसं, तेरा पन्नें (हिंदी मालिका), महाश्वेता, लाल गुलाबाची भेट अशा दूरचित्रवाणी कार्यक्रम व मालिकात भूमिका केल्या आहेत.
पूर्वी दूरदर्शनवरच्या ‘आमची माती आमची माणसं’ या कार्यक्रमात ‘गप्पागोष्टी’ नावाचा एक २२ मिनिटांचा उपकार्यक्रम असे. ‘गप्पागोष्टीं’मध्ये रवी पटवर्धन ‘वस्ताद पाटील’ असत. त्यांची ही भूमिका ज्यांनी पाहिली त्यांच्या ती अजूनही स्मरणात असेल. शिवाजी फुलसुंदर हे त्या कार्यक्रमाचे निर्माते होते.
वयाच्या ८० व्या वर्षी भगवतगीतेचे ७०० श्लोक पाठ करून त्यांनी शृंगेरी मठाच्या परीक्षेत पहिला क्रमांक पटकावला होता. सध्या ते ठाण्यात वास्तव्यास होते. रवी पटवर्धन यांना झी नाट्य गौरव २०२० चा जीवन गौरव पुरस्कार मिळाला होता. रवि पटवर्धन यांचे ६ डिसेंबर २०२० रोजी निधन झालं.
Leave a Reply