महाराष्ट्रातील नामांकित महिला समाजसेविकांपैकी एक तसंच कुष्ठरोगी, आदिवासी यांच्यासाठी निरपेक्ष मनाने काम करणार्या साधनाताई आमटे यांचा जन्म नागपूर येथे ५ मे १९२७ साली झाला.
कुष्ठरोग्यांसाठी काम करणार्या मुरलीधर देवीदास आमटे अर्थात बाबा आमटे यांच्यासोबत १९४६ साली त्या विवाहबध्द झाल्या. डॉ. बाबा आमटे यांच्या जीवनपटलावरती धावती नजर फिरवणारे, व त्यांच्या गुण दोषांवर प्रकाश टाकणारे निर्भीड असे “समिधा” हे आत्मचरित्र लिहिले. हे आत्मचरित्र तमाम मराठी साहित्यप्रेमींकडून नावाजले गेले. याशिवाय अनेक दर्जेदार पुस्तके व कादंबर्या लिहून त्यांनी आपली एक अत्यंत चौकस व प्रतिभावंत लेखिका ही ओळख मिळविली.
बाबा आमटे यांच्या जीवनकार्याला व त्यांच्या प्रत्येक निर्णयाला व अभिनव उपक्रमांना, त्यांनी खंबीर व सक्रिय अशी साथ सोबत दिली होती. त्यासोबतच कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनाचे कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातल्या आनंदवन आश्रमाच्या उभारणीत सुध्दा त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. चतुरंग प्रतिष्ठानच्या २००७ सालच्या चतुरंग जीवनगौरव पुरस्काराने साधना आमटे यांना सन्मानित करण्यात आले होते.
डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. विकास आमटे हे त्यांचे पुत्र त्यांचा आणि बाबा आमटे यांचा वारसा चालवित आहेत.
९ जुलै २०११ रोजी गडचिरोली जिल्ह्यातील आनंदवन येथे साधनाताईंचे निधन झाले.
Leave a Reply