अभिनय दिग्दर्शन, लेखन, डबींग, नेपथ्य व प्रकाश योजना ह्या आणि अशा विविध क्षेत्रांत आपला ठसा उमटविणारे संजय बोरकर ह्यांच्या कारकिर्दीची सुरुवात ठाण्यातील शिवसमर्थ विद्यालयातून एकांकिका स्पर्धांमधून झाली. “मित्र सहयोग, ठाणे” या संस्थेतून अनेक प्रायोगिक नाटकं, स्पर्धा करत असताना प्रभाकर पणशीकर यांच्या “अश्रूंची झाली फुले” या नाटकात “श्याम” ची भूमिका मिळाली आणि तिथूनच मग मराठी आणि हिंदी टिव्ही मालिकांमध्ये प्रमुख भूमिका मिळाल्या. “जसा बाप तशी पोरं” ह्या चित्रपटात त्यांना सहाय्यक खलनायकाची भूमिका मिळाली. सोबत अनेक मराठी मालिकांचे लेखन व दिग्दर्शन त्यांनी केले. दुर्गा, वारणा, भूमिपुत्र, घे भरारी मी मराठी वरील विविध मालिकांमध्ये त्यांनी आपल्या कलेचा प्रवास केला. अक्षता अश्रूंची ही मराठी फिल्म लिहली. याचबरोबर दामिनी, बंदिनी, रिमझिम, वसुधा, वादळवाट, असंभव, अनुबंध, अनामिका, मृत्युंजय अशा अनेक मराठी, तसेच सी.आय.डी., वक्त की रफ्तार, जस्सी जैसी कोई नही, कुमकुम, ऑल दि बेस्ट, मुकद्दर, हॅलो इनस्पेक्टर, ह्या हिंदी मालिकांमध्ये त्यांनी भूमिका केल्या आहेत. सरकार, आई नं १, छडी लागे छमछम ह्या हिंदी व मराठी चित्रपटांमध्येही त्यांनी काम केले.
ठाण्यातर्फे नाट्यस्पर्धांमध्ये भाग घेऊन राज्य शासनाच्या दिग्दर्शन व अभिनय पारितोषिकांवर स्वत:ची मोहोर उमटवली. शालेय विद्यार्थ्यांना नाटके बसवून अभिनयाचे धडे दिले आहेत. जागतिक अपंग दिनानिमित्त होणार्या राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेत सलग पाच वर्ष मतिमंद मुलांना घेऊन अजिंक्यपद मिळवले आहे.
Leave a Reply