महाराष्ट्राच्या सन्त परंपरेला महाराष्ट्रेतर प्रदेशचं वावडं नव्हतं, हे आपल्याला संत नामदेवांच्या काळापासून माहित आहे. विश्वात्मकता हे सन्तांच्या विचारसरणीचं अधिष्ठान होतं व त्यांच्या तत्त्वज्ञानानून व साहित्यातून तीच प्रतिबिम्बित झाली आहे.
महाराष्ट्रातील नागेश सम्प्रदायाची सन्त परंपरा केवळ महाराष्ट्रात आढळत नाही तर ती कर्नाटकातही आढळते. बेळगावच्या वाटेवरील हत्तरगी हे गाव कर्नाटकात आहे. तेथील आधुनिक संत हरिकाका गोसावी ह्यांची परंपरा संत एकनाथांपासून आहे. रामदास स्वामींच्या संप्रदायाची व शिष्यांची परंपरा केवळ महाराष्ट्रा आढळत नाही तर मध्य भारतात व दक्षिण भारतातही आढळते. संतांना नि त्यांच्या परंपरेला भूगोलाच्या सीमा रेषांचं कसं असेल ?
गोंदवलेकरांच्या शिष्यपरंपरेचा फारसा विचार महाराष्ट्राच्या वाड्मयेतिहासात झाला नाही. तो करुन देणं अगत्याचं असल्यानं त्यांच्या शिष्यपरंपरेचा साहित्याचं स्वरुप दर्शन या लेखात हेतुत: घडवून दिलं आहे.
ब्रम्हानंद महाराजांचा जन्म भारताच्या १८५७ च्या स्वातंत्र्यसमराच्या आगेमागे झाला त्याचा मास व तिथी माघ वद्य दशमी अशी नोंदविली असून इसवी सनानुसार त्यांचं जन्मवर्ष १८५९ हे आहे.
त्याचं घराणं कर्नाटकातील जालीहाळ गावाचं. भक्तीची परंपरा त्यांच्या घराण्यात असून हे गाडगोळी घराणं त्या भागात वेदविद्या पारंगत म्हणून प्रसिद्ध होतं. त्यांचे वडील वाळंभट्ट हे वेदशास्त्र संपन्न पंडित होते. असं असलं तरी त्यांचे पुत्र अनंत (हे ब्रम्हानंदमहाराजांचं सन्यासग्रहणापूर्वीचं नाव) मात्र तसे नव्हते त्यांचे बालपण वेदोध्ययानात न जाता खेळण्याबागडण्यात उनाडकीत जाऊ लागलं. तु कुलर्दपक नसून कुळाला काळिमा फासणारा आहेस, असं बाळंभट्टांनी कंटाळून नि अत्यंत त्रस्त होऊन म्हटल्या वर अनंताला पश्चाताप झाला व परतीही झाली. मुळगुंदच्या पंडित रघुनाथ शास्त्रींकडे त्यांनी वेदाध्ययन केलं. शास्त्री बुवांच्या सत्संगाचा योग्य तो परिणाम झाला व अनंतानं वेदाध्ययन पूर्ण केलं एवढंच नव्हे तर ते भागवत ही सांगू लागले अनंताच्या जीवनातील हा कायापालटच होता. ब्रम्हचैतन्य हेच आपले गुरु आहेत असा दृष्टान्त झाल्यावर ते गोंदवल्यास आले नि त्यांनी ब्रम्हचैतन्यांचा अनुग्रह घेतला.
ब्रम्हानंदमहाराजांनी आपल्या गुरुचा महिमा आपल्या अनेक अभंगातून अत्यंत श्रद्धेने व्यक्त केला आहे.गुरुर्ब्रह्मा या सूत्राची प्रचीती त्यांच्या या अभंगातून येते, त्यातील गुरुराव माझे ब्रम्हची साकार या मध्यवर्ती संकल्पनेवरुन त्यांच्या गुरुभक्तीची सहज कल्पना येईल.
साष्टांग वंदूनी सदगुरुरायासी । चिंतावी मानसीं गुरुमूर्ति ।।
गुरुराव माझे ब्रम्हचि साकार । केला उपकार धरुनी देह ।।
नाहीं निराकार नाही हो साकार । ऐसा गुरुवर माझा आहे ।।
निर्वाच्य ब्रम्ह चैनत्यसि आलें । दुष्टहि तरले दर्शनयोगें ।।४।।
सकल निगमागम नेणती महिमा । नाहीं दुजी उपमा सदगुरुसी ।।५।।
दीन ब्रम्हानंद प्रार्थीतसे भावें । मन लय व्हावें रामरुपीं ।।६।।
कधी ते आपल्या गुरुला रामस्वरुप मानतात तर कधी तो मारुतीचा अवतार आहे, असंही मानतात.
गुरुच्या वात्सल्याची ते मातेच्या वात्सल्याची तुलना करतात म्हणूनच ते आपल्या गुरुला ‘सद्गुरुआई’ असंही म्हणतात. या संदर्भातील त्यांचा अभंग असा आहे.
ऐसे करीं सद्गुरुआई । आपुलें स्मरण वसो ह्दयी ।।१।।
नावडो हे विषयध्यान । रामनामी लागो मन ।।२।।
देहबुद्धि उकरुन । लावीं रोप समाधान ।।३।।
पळवी माझी दुजी भ्रांति । वासना जाळुनि देई शांति ।।४।।
बहु बळकट चिज्जडग्रंथी । सोडुनि दावा दाशरथि ।।५।।
ब्रम्हानंदी अशा फार । करीं दीनाचा उद्धार ।।६।।
आपण परमार्थमार्गाला लागन शक्यच नव्हतं कारण ते आपल्या प्रारब्धात नव्हतं तरीही गुरुकृपेमुळं आपल भाग्य उजळलं आणि आपण परमार्थमार्गाला लागलो यामूळं आपला गुरु हेच आपलं वैकुंठ आहे आणि तोच आपला कैलास आहे. तेच आपलं ब्रम्हज्ञान आहे. आणि तोच आपला मोक्ष आहे, असं ब्रम्हानंदमहाराज म्हणतात. अशा गुरुची अखंड सेवा करण्याचं भाग्य आपल्याला लाभो अशा विनवणीही ते परमेश्वराजवळ करतात.
परमार्थाची रेषा नाही कपाळांत । करवी सदगुरुनाथ अपुले सत्ते ।।१।।
आपले सत्तेने तोडी कर्मफांसा । माझा सदगुरु ऐसा कृपानिधी ।।२।।
कृपानिधी एक धरिला असे भावें । काय तें करावें वैकुंठासी ।।३।।
वैकुंठ कैलास आम्हां सदगुरुप्राय । चुकती अपाय तेणें सर्व ।।४।।
हाचि माझा मोक्ष, हेंचि ब्रम्हज्ञान । नाम मुखीं चरणसेवा करुं ।।५।।
सेवा अखंडित राहो माझे चित्ती । हरीची विनंती पायापाशीं ।।६।।
आणि केवळ असं सांगूनच ब्रम्हानंदमहाराज थांबत नाहीत तर ते आयुष्यभर आपल्या गुरुची अत्यंत निष्ठेनं सेवाही करतात.
संदर्भ – डॉ.यू.म.पठाण यांचा ‘महान्यूज’मधील लेख.
Leave a Reply