जन्म- अज्ञात वर्ष
मृत्यू- इ.स. १३३८
चोखामेळा (चोखोबा) हे यादव काळातील नामदेवांच्या संतमेळ्यातील वारकरी संतकवी होते. ते जातीने महार होते. चोखोबांचा जन्म पंढरपूरला झाल्याचे महिपती सांगतात. चोखोबा मूळ वर्हाडातील आहेत असेही म्हटले जाते. त्यांचा मृत्यू गावकुसाच्या कामात दरड कोसळून झाल्याचे नमूद केले आहे. त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या हाडातून विठ्ठल नामाचा गजर ऐकू येत होता, नामदेवांनी चोखोबांची हाडे ओळखून ती गोळा केली व पंढरपूरला विठ्ठल मंदिरासमोर त्यांची समाधी बांधली असे चरित्रकार सांगतात. चोखोबांचा धर्मक्षेत्रात छळ झाला असला तरी, यातीहीनत्वाची झोंबणारी जाणीव असतांनाही ते ते चोख (स्वच्छ) आहेत. कोणताही संत जन्मतः संत असत नाही. ‘संतत्व’ ही प्राप्त केलेली मनोवस्था आहे. हे त्यांच्यावरुन निदर्शनास येते. ‘शुद्ध चोखामेळा करे नामाचा सोहळा’ अशी आपल्या नावामागे ते शुद्धत्वाची ग्वाही देऊन. देहभाव नष्ट झाल्याचे सांगतो. मेळा (अपवित्र) असणारा माणूसही भगवंताच्या दारी (चोख) पवित्र होतो. चोखोबांनी ‘वाणी नाही शुद्ध | धड न ये वचन’ असे आपल्या अभंगात म्हटले असले तरी, तो त्यांचा विनय आहे. त्यांची अभंगवाणी निर्दोष असलेली दिसते. व्याकरण,विवेचन आणि वाड;मय या तीनही दृष्टीनी त्याची वाणी चोख आहे. उत्कटता, सामाजिक आशय, बांधीव रचना, या गुणांमुळे त्यांच्या अभंगाला मराठी सारस्वतात मानाचे स्थान प्राप्त झाले आहे. नामदेव प्रणीत भक्तियात्रेत संत चोखोबा, पत्नी संत सोयराबाई , बहीण निर्मळा, पुत्र कर्ममेळा आणि मेहुणा बंका हे कुटूंबीय सहभागी झाले होते. नामदेवाप्रमाणे समग्र कुटुंबच भक्तिभावात एकरुप झाले दिसते
Leave a Reply