आठवले, शांताराम

Athavale, Shantaram

शांताराम आठवलेंचा जन्म पुणे येथे २१ जानेवारी १९१० रोजी झाला. त्यांचे वडील ग्वाल्हेरच्या सरदार शितोळे यांचे पुण्यातील कारभारी होते. त्यांना साहित्य आणि कला यात खूप रस होता. शांताराम आठवल्यांची आई अशिक्षित तरीपण सुसंकृत आणि व्यवहारी होती. जुन्या ओव्या, घरगुती पारमार्थिक गाणी यांचा न संपणारासाठाच तिच्याजवळ होता. ती जात्यावर बसली की तिच्या समोर बसायचे, आणि तिच्या सुरेल ओव्या लक्षपूर्वक ऐकून मनात साठवायच्या हा छोट्या शांतारामाचा परिपाठ होता.

शांताराम आठवल्यांचे शिक्षण पुण्याच्या भावेस्कूल मध्ये झाले. ओकशास्त्री, माधवराव पटवर्धन, वा.भा.पाठक हे साहित्यिक, बापूसाहेब किंकर हे इंग्रजी भाषेचे विद्वान शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शाळेत असतानाच शांताराम आठवलेंनी भाषांवर प्रभुत्व मिळवले. त्याच वेळी त्यांच्या कविता नियतकालिकात प्रसिद्ध होऊ लागल्या. हस्तलिखिते, मासिके, वक्तृत्वस्पर्धा यातही ते भाग घेत. वाचन, लिखाण यांच्या बरोबरच “बेबंदशाही”,“शिवसंभव” या सारख्या नाटकात अभिनय व दिग्दर्शन करुन ती क्षेत्रेही आठवल्यांनी शाळेत असतानाच गाजवली.

१९२६ ते १९३१ या काळात आठवलेंनी “शाकुंतल” ते “खडाष्टक” अशी संगीतरंगभूमीवरील सर्व नाटके मनमुराद पाहिली. त्यांचे चुलतबंधु यशवंतराव आठवले गंधर्व नाटक मंडळीत नट होते. त्यांची नाटके तर ते पाहतच पण त्यांच्याबरोबर नाटक मंडळीच्या बिऱ्हाडी जाऊन त्यांच्या तालमी, जेवणावळी यांचीही मजा अनुभवत. आठवल्यांना शितोळे वाड्याच्या दिवाणखान्यात उत्कृष्ट दर्जाची लावणी ऐकायला मिळाली. डोक्यावर आणि हाताच्या तळव्यावर जळत्या समया घेऊन केलेले बहारदार लावणीनृत्यही पाहायला मिळाले. वाड्यावर पेशवाईतील सुप्रसिद्ध शाहीर सगनभाऊ यांची पुण्यतिथी साजरी होत असे.अवघ्या महाराष्ट्रातील ‘शाहीर’,’तमासगीर’,’लावणीकार’ तेथे हजेरी लावत.यामुळेलोकगीतांचे समृद्ध भांडार आठवले यांना खुले झाले होते.

१९२९ साली आठवलेंच्या वडिलांना पक्षाघात झाला आणि त्यातच त्याचा दु:खद अंत झाला. त्यामुळे शांताराम आठवलेंच्या शिक्षणात काहीसा खंड पडला.१९३१ साली आठवले कुटुंब पुण्याहून कोलवडी या त्यांच्या वतनाच्या गावी आले जिथे आठवले कुटुंबाचे घर आणि शेत होते.

याच काळात आठवले नोकरीच्या शोधात होते. सुप्रसिद्ध कादंबरीकार ह.ना.आपटे यांची व आठवलेंची पत्रमैत्री होती. आपटे यांना कोरेगावला त्यांच्या “मधुकर” या मासिकाचे संपादनसहाय्य व मुद्रणालयाच्या कामासाठी आठवलेंसारखाच माणूस हवा होता आणि आठवले यांनाही उपजीविकेचे साधन हवे असल्याने आठवलेंनी कोलवडीला अलविदा करत कोरेगाव गाठले. त्यांच्या कवितांचा पहिला संग्रह “एकले बीज” या नावाने १९३८ साली म्हणजे ते प्रभातकवी झाल्यानंतर प्रसिद्ध झाला. त्या पाठोपाठ १९४० साली “बीजांकुर” हा दुसरा प्रसिद्ध झाला. “सकाळ”, “स्वराज्य” ”अश्या वर्तमानपत्रात तर “मनोहर”, “वांग्मयशोभा” यांसारख्या मासिकांमधून व “शालापत्रक” या लहान मुलांच्या मासिकात त्यांच्या कविता नेहमी प्रसिद्ध होत असत.“मधुकर” मासिकाच्या पत्रव्यवहारात एक दिवस एक लक्ष वेधून घेणारे, हिरव्या शाईत लिहिलेले पत्र आले. त्याखाली मोठ्या, स्वच्छ व वळणदार अक्षरात डौलदार सही होती “व्ही शांताराम” यांची. प्रभात फिल्म कंपनी पुण्याला स्थलांतर करणार होती. त्यानंतर ना ह आपटे यांना त्यांनी भेटायला बोलावले होते. प्रभात फिल्म कंपनी आपटे यांच्या ‘भाग्यश्री’ या कादंबरीवर आधारित चित्रपट तयार करू इच्छित होती. भेटीत त्या योजनेवर शिक्कामोर्तब झाले. चित्रपटाचे नाव ठरले “अमृतमंथन”.शांताराम आठवलेंच्या साध्या सोप्या काव्यरचनेने आपटे खूपच प्रभावित झाल्यामुळे त्यांनीयाअमृतमंथन चित्रपटाची गीते लिहिण्यासाठी आठवले यांचे नाव सुचवले आणि सुदैव असे की ते मान्यही झाले.

“अमृतमंथन” मधील गीतांनी आठवले यांना प्रभातमध्ये कायम स्वरुपाची नोकरी मिळणे शक्य झाले. १ जानेवारी १९३५ या दिवशी आठवले प्रभात फिल्म कंपनीच्या संगीत विभागात रुजू झाले. गीतकार, पद्यलेखक आणि सहाय्यक दिग्दर्शक अशी जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. त्यामुळे चित्रपट हे शांताराम आठवलेंचे कार्यक्षेत्र ठरून गेले.’अमृतमंथन’ नंतर “संत तुकाराम”,“कुंकू”,“गोपालकृष्ण”,“माझा मुलगा”,“संत ज्ञानेश्वर”,“शेजारी”,“संत सखू”,“दहा वाजता” आणि “रामशास्त्री” या प्रभात चित्रपटांसाठी आठवले यांनी गीते लिहिली. कथानक, त्यामधला गाण्याचा प्रसंग, त्यानुरूप आधी चाल आणि मग त्यावर शब्दरचना अशी कसरत असूनही गीतात काव्य, भाषेचा गोडवा, कल्पनेचे नाविन्य, शब्दांचे नादमाधुर्य आणि कुणालाही चटकन समजेल आणि भावेल असा साधेपणा आणि सोपेपणा राखायचे अवघड काम शांताराम आठवले यांनी केल्या मुळेच त्यांचे स्थान “मराठी चित्रपटगीतांचे आद्यकवी” असे आहे.

दहा चित्रपटांतील साध्या सोप्या शब्दातल्या परंतु अर्थपूर्ण गीतांमुळे आठवले यांना प्रसिद्धी मिळाली. त्यांच्या गीतांमुळेच अनेक चित्रपट यशस्वी झाले, चित्रपटरसिकांनी त्यांच्या गीतांसाठी चित्रपट पाहिले, समीक्षकांनीही त्यांची गीते नावाजली. ‘केसरी’ सारख्या वृत्तपत्राने देखील त्यांच्या “आधी बीज एकले” या गीताचे कौतुक करणारे स्फुट लिहिले होते. त्यांच्या गीतांच्या ध्वनीमुद्रिकांना प्रचंड खप होता. म्हणूनच एच. एम.व्ही कंपनीने पुढेही त्यांच्याकडून पुष्कळ गीते लिहून घेतली. ती नामवंत संगीतकारांकडून स्वरबद्ध करुन त्याकाळच्या लोकप्रिय गायक गायिकांकडून गाऊन घेऊन त्यांच्या ध्वनिमुद्रिका प्रकाशित केल्या. त्यांच्या अशा नाव लौकिकामुळे त्यांना, प्रभातच्या चालकांच्या परवानगीने, “भरतभेट”,“आपले घर” अशा काही प्रभात बाहेरच्या चित्रपटांसाठीही गाणी लिहावी लागली यामध्ये “भाग्यरेखा”,“बेलभंडार”,“झंझावात”, “वहिनीच्या बांगडया”, “शेवग्याच्या शेंगा”,“आई मला क्षमा कर”,“पडदा”,“सुभद्राहरण”,“वावटळ” या चित्रपटांचा समावेश आहे.

प्रभातमध्ये काम करत असतानाच १९३९ च्या जून महिन्यात शांताराम आठवलेंचा विवाह रामदुर्ग संस्थानचे कारभारी असलेल्या श्री.सहस्रबुद्धेंच्या कन्या ‘लीला’ उर्फ ‘सुमती’ यांच्यासोबत झाला; आणि पुढील पाच वर्षात आठवलेंना ३ आपत्येप्राप्ती झाली.पैकी दोन कन्या मंगला, अभया आणि मुलगा सुदर्शन होय.

शांताराम आठवले यांनी “शांतिचिया घरा”,“बकुळफुले”,“वनातली वाट”,“कुंडलीनी जगदंबा”,“सुखाची लिपी”,“ओंकार रहस्य” आणि “प्रभातकाल” या सारखी एकापेक्षा एक सरस पुस्तके लिहिली.याशिवाय त्यांच्या भाव कविता, चारोळ्या, बालगीते यासारखे वाङ्मय देखील लोकप्रिय ठरले आहेत.

अश्या या थोर साहित्यिक व गीतकाराने वयाच्या ६५व्या वर्षी म्हणजे २ मे १९७५ रोजी या जगाचा निरोप घेतला.

अधिक माहितीसाठी खालील लिंक्स क्लिक करा.

थोर साहित्यिक व गीतकार शांताराम आठवले (23-Jan-2017)

थोर साहित्यिक व गीतकार शांताराम आठवले (2-May-2017)

थोर साहित्यिक व गीतकार शांताराम आठवले (24-Jan-2018)

1 Comment on आठवले, शांताराम

  1. अत्यंत उपयुक्त माहिती मिळाली.

Leave a Reply

Your email address will not be published.


*