गांधीवादी विचारांच्या प्रसारक, ज्येष्ठ सामाजिक कार्यर्कत्या, दूरदृष्टी असलेल्या गांधीवादी, लहान मुलांसाठी लाडकी आजी, अशा शोभनाताई! गेल्या सहा दशकांहून अधिक काळ महिला सबलीकरण, मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकास आणि तरुण पिढीपर्यंत गांधीजींचे विचार पोहोचण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या शोभनाताई. महिलांना स्वातंत्र्यच नव्हे तर स्वत:ची मतं मांडण्याचे अधिकारही मिळाले नव्हते, अशा काळात नाशिकमध्ये १९३५ साली काही मुलींनी ‘यापुढे आम्ही केवळ देशासाठीच जगणार’ अशी शपथ घेतली होती. पुढे हीच संस्था ‘हिंद सेविका संघ’ म्हणून नावारूपास आली. या मुलींमध्ये अवघ्या तेरा वर्षांची एक मुलगी म्हणजेच शोभना रानडे यांचाही समावेश होता.
नाशिकमध्ये राहत असताना शोभनाताईंनी स्वातंत्र्यवीर सावकर यांची भारावणारी व्याख्याने ऐकली होती. तेव्हापासूनच मातृभूमीसाठी योगदान देण्याची भावना त्यांच्या मनात निर्माण झाली. पण शोभाताईंच्या घरचे थोडे जुन्या विचारांचे असल्याने त्यांना हे काम आवडत नव्हते. त्यामुळे सोळा वर्षांच्या असतानाच शोभनाताईंचा बालकाका रानडे यांच्याशी विवाह झाला. उल्लेखनीय बाब म्हणजे त्यांचे सासरे आधुनिक विचारसरणीला प्रोत्साहन देणारे असल्याने मुलींनी भरपूर शिकावे, त्यांचे सबलीकरण झाले पाहिजे, असे त्यांचे ठाम होते. अर्थातच त्यांनी शोभनाताईंनाही शिक्षणासाठी पाठिंबा दिला.
अर्थशास्त्रात बी.ए. केल्यानंतर सोशॉलॉजीमध्ये त्यांनी एम.ए केले. स्वातंत्र्यापूर्वी महात्मा गांधी आगाखान पॅलेसमध्ये आले असताना शोभनाताईंनी त्यांचे विचार ऐकले आणि त्यांचा समाजसेवेचा निर्णय अधिकच दृढ झाला. महात्मा गांधी यांची सत्याग्रह मोहीम सुरू असताना, त्या जोमाने कामाला लागल्या. पुढे १९५० मध्ये रानडे यांचे कुटुंब आसाममध्ये वास्तव्यास गेले. पण तिथेही त्यांनी अठरा वर्षे ‘मैत्रेयी’ या संस्थेच्या माध्यमातून महिला सबलीकरण आणि मुलांसाठी काम करतानाना आपल्यातल्या प्रेमळ व तत्पर समाजसेविकेची झलक दाखवून दिली. शोभना रानडे यांना भारत सरकारच्या पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे
विनोबा भावे यांचाही जादुई सहवास त्यांना लाभला. हैदाबाद येथे विनोबाजी भूदान चळवळीत सक्रिय असताना आणि आसाम येथील त्यांच्या पदयात्रेच्या वेळी, शोभनाताईंनी त्यांच्याबरोबर काम केले. त्यांचे उल्लेखनीय कार्य पाहून आसाम काँग्रेस कमिटीनेही त्यांना निवडणूक लढण्याचा आग्रह केला होता. राजकारणात शिरण्याची चांगली संधीही त्यावेळी होती. पण विनोबांनी यास नकार दर्शविल्याने त्यांनी उमेदवारी नाकारली.
१९७९ पासून गांधी मेमोरियल सोसायटीबरोबर काम करण्यास त्यांनी प्रारंभ केला. आगाखान पॅलेस कमिटीत ट्रस्टी असून, सध्याच्या काळात शांतताप्रिय समाज घडविण्यासाठी त्या गांधीजींच्या तत्वांनी व अहिंसाप्रिय मार्गांनी प्रेरित झालेल्या एकनिष्ठ अशा तरूणांची भक्कम फळी उभारित आहेत.
( संदर्भस्त्रोत- महाराष्ट्र टाईम्स )
Leave a Reply